Samruddhi Mahamarg Accident News: समृद्धी महामार्गावर दोन ट्रकमध्ये आज (२५ ऑक्टोबर २०२४) पहाटे अपघाताची घटना घडली. वाशिमच्या कारंजा टोल प्लाझाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. यापैकी एका ट्रकमध्ये केमिकल असल्याने आग लागली. या आगीमुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने, या अपघात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे चार वाजताच्या सुमारास वाशिमच्या कारंजा टोल प्लाझाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकमध्ये केमिकलच्या कॅन होत्या. त्यामुळे लगेच आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु, नागपूरच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
सायन-पनवेल महामार्गावर भरधाव कारची टेम्पोला धडक दिल्याची घटना सोमवारी घडली. या अपघातात कारमधील एक जण जागीच ठार झाला. तर, दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी टेम्पो चालकावर पार्किंग लाइट न लावता निष्काळजीपणे टेम्पो पार्क केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नरेंद्र राजेंद्र राय (वय, ४५) असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, गौरव विजयशंकर सिन्हा (वय, ४५) आणि अभिनव रामकुमार सिन्हा (वय, ४०) अशी जखमींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही कस्टम अधिकारी असून रात्रीच्या शिफ्टवरून घरी जात होते. परंतु, नवी मुंबईतील जुईनगर स्कायवॉकजवळ त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
नवी मुंबईतील सीवूड्स स्थानकात रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.सना अब्दुल सिद्दीकी, असे मृत मुलीचे नाव असून ती गोवंडी येथील रहिवासी होती. जीआरपी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या आर्थिक वर्षात वाशी जीआरपी अंतर्गत १०५ अपघात झाले आहेत. यामध्ये गोवंडी ते सीवूड्स आणि तुर्भे ते रबाळे या ११ स्थानकांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या