केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईत कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर कथित ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी वानखेडे यांनी शाहरुखकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केले आहे. या एफआयआरची दखल घेत ईडीने काल, शुक्रवारी वानखेडेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी समीर वानखेडे यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. 'याप्रकरणी आपण न्यायालयात योग्य ते उत्तर देऊ', असं समीर यांनी म्हटलं आहे.
समीर वानखेडे म्हणाले, ‘ईडीने २०२३ मध्ये (ECIR) Enforcement Case Information Report दाखल केली होती. हा ईसीआयआर सीबीआयच्या एफआयआरवर आधारित असून यावर मुंबई हायकोर्टाने आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यापुढे काहीही भाष्य करण्याचा माझा हेतू नाही. मी योग्य वेळी न्यायालयात योग्य ते उत्तर देईन. माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सत्यमेव जयते…’ असं वानखेडे म्हणाले.
ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) हा गुन्हा दाखल केला आहे. यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) काही माजी अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आले असून यात समीर वानखेडे यांचा समावेश आहे. वानखेडे हे भारतीय महसूल सेवा (IRS) २००८ च्या बॅचचे अधिकारी असून ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
आर्यन खानला २ ऑक्टोबर २०२१ रोजी कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर कथित ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. आर्यन खानला अटक न करण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एनसीबीच्या तक्रारीवरून सीबीआयने समीर वानखेडेविरोधात गेल्या वर्षी मे महिन्यात गुन्हा दाखल केला होता. वानखेडे आणि इतरांविरोधात गुन्हेगारी कट रचणे (१२०-बी आयपीसी), खंडणीची धमकी (३८८ आयपीसी) तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत लाचखोरीशी संबंधित गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात एनसीबीने १४ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. परंतु आर्यन खानला क्लीन चिट दिली होती. आर्यनला सोडण्यासाठी एनसीबीचे अधिकारी आणि साक्षीदार गोसावी यांच्यासह अन्य व्यक्तींनी २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा एका 'स्वतंत्र साक्षीदाराने' २०२१ मध्ये केला होता. त्यानंतर एनसीबीने समीर आणि इतरांची कार्यालयीन चौकशी केली होती. त्याचा अहवाल सीबीआयला सादर केला होता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.