मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Reservation Bill : मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळाल्यानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

Maratha Reservation Bill : मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळाल्यानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 20, 2024 04:14 PM IST

Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation : मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati

विधीमंडळात आज मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले असून विधानपरिषदेत सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर याचे कायद्यात रुपांतर होणार आहे. मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतल्यानंतर तीन महिन्यातच मराठ्यांना आरक्षण दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. यावर मराठा आरक्षणासाठी लढणारे छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजीराजेंनी म्हटलं आहे की, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी आधी मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे, त्यासाठी शासनाने राज्य मागासवर्ग आयोग गठित करून मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करावे, ही मागणी घेऊन मी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो.

 

शासनाने ही मागणी मान्य करत मराठा समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करून मराठा समाजास आरक्षण लागू केले, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व राज्य सरकारचे विशेष आभार व कौतुक ! अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करून हे आरक्षण न्यायालयात टिकविण्याची जबाबदारी देखील शासनाने कटाक्षाने पार पाडावी.

आरक्षण टिकण्यासाठी सरकार पूर्णपणे न्यायालयाला आपली बाजू पटवून देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मराठा आरक्षणासाठी लवकरच कायदा करण्यात येणार असून आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी सरकारकडून विशेष खबरदारी देखील घेतली जाणार आहे. आधीच्या त्रुटी दूर करून आम्ही आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत नक्कीच टिकणार, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला आहे.

IPL_Entry_Point