पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवण येथील राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी भव्य पुतळा कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनानिमित्त या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र एक वर्ष पूर्ण होण्याआधीचमुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा कोसळल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेंमीकडून पुतळ्याच्या दर्जावरून संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय वर्तुळातूनही याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. आता संभाजीराजे छत्रपतींनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होते. मात्र हा पुतळा अचानक कोसळल्याने याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुतळा नेमका कशामुळे कोसळला याचे कारण समोर आले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या पुतळ्याची जबाबदारी देण्यात आली होती. या घटनेवरुन संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची मागणी केली आहे.
संभाजीराजेंनी म्हटले की, पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला ! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार! आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊ दे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.
मालवणच्या समुद्रकिनारी असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर सर्वत्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. यानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आक्रमक झाले असून त्यांच्या समर्थकांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. यातच महाराजांचा पुतळा कोसळल्याने वैभव नाईक यांनी थेट मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागात जात कार्यालयाची तोडफोड केली आहे.