Sambhajinagar news : संभाजी नगर येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे मृत्यूपूर्वी त्याने सुसाइड नोट लिहिली असून यात त्याने एका भाजप आमदाराचे नाव लिहिले आहे. त्याने दिलेल्या त्रासामुळे जीवन संपवत असल्याचं आत्महत्या केलेल्या तरुणानं म्हटलं आहे. जयदत्त सुरभेये असे या तरुणाचं नाव आहे. तर त्याने त्याच्या सुसाईड नोटमध्ये भाजप आमदार नारायण कुचे यांचे नाव लिहिलं आहे. त्यांनी दिलेल्या धमक्यांमुळेच आत्महत्या करत असल्याचं त्याने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.
जयदत्त सुरभेये याने आमदार नारायण कुचे यांच्या जय भवानी बँकेकडून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज फेडण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला जात असल्याची माहिती आहे. या त्रासाला कंटाळून कंटाळून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्याने त्याच्या सुसाइड नोटमध्ये आमदार नारायण कुचे धमकावत असल्याचा उल्लेख केला असून यामुळे आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी कुचे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या आरोपांवर आमदार नारायण कुचे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आत्महत्या केलेल्या जयदत्त सुरभेये या तरूणाला ओळखत नसून त्याच्याशी कधी बोललो नाही असे कुचे यांनी म्हटलं आहे. मृत तरुण माझा नातेवाईकच असून त्याची बहीण माझी सून आहे. तर त्याचा मेहुणा माझ्या पतसंस्थेत नोकरीला आहे. त्यामुळे या प्रकारात गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं कुचे यांनी म्हटलं आहे. तसेच पोलिस आधीक्षकांना या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली असल्याचं देखील कुचे यांनी म्हटलं आहे.
कुचे म्हणाले, संबंधित नोटमध्ये फोनवरून धमकी दिल्याचा आरोप होतो आहे. मी असे काही करणाऱ्यातला नाही. मृत तरुणावर दोन लाख रुपयांचं कर्ज आहे. तर त्याच्या कर्जाचे हप्ते देखील नियमित फेडले जात आहेत. त्यामुळे पोलिसांना भेटून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली असल्याचं कुचे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस काय कारवाई करणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.