Sambhaji Bhide controversial remark : महात्मा गांधी यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणारे 'शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान'चे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे हे टीकेच्या रडारवर आले आहेत. काँग्रेसच्या आमदारांनी भिडे यांच्या अटकेची मागणी विधानसभेत केली आहे, तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भिडे यांची लायकीच काढली आहे.
विधान भवनाच्या आवारात जितेंद्र आव्हाड प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी भिडे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. 'भिडे जे काही बोलले त्यावर कारवाई काय झाली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणीही उठावं, काहीही बोलावं, फेसबुक, ट्विटरवर टाकावं. सावित्रीमाई, शाहू महाराज, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलावं अशी परिस्थिती सध्या आहे. भिडे नावाचा माणूस जे काही बोललाय ते पुन्हा बोलायलाही किळस येतेय, असं आव्हाड म्हणाले.
‘या माणसाची बुद्धी भरकटलेली आहे. सुशिक्षित माणूस समाजापुढं येणारा हा माणूस प्रत्यक्षात अशिक्षित आहेत. याच्याकडं कुठल्याही डिगऱ्या नाहीत. दरवेळी हिंदू-मुसलमान कशासाठी?,’ असा सवाल आव्हाड यांनी केला.
‘कोणाबद्दल बोलावं याचं काही भान आहे की नाही? माणसानं लायकीप्रमाणे बोलायला हवं. महात्मा गांधींच्या करंगळीवरील धुळीएवडीही या भिडेची लायकी नाही. ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी मनं पेटवली. त्या महात्मा गांधींंबद्दल हा बोलतो. जगभरातून येणारे ज्यांच्यासमोर नतमस्तक होतात, त्या गांधीजींच्या वडिलांबद्दल, त्यांच्या पितृत्वाबद्दल शंका घेणं हे नीच काम दुसरा कुणीही करू शकत नाही,’ असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला.
'ह्या सगळ्या विधानांमागे हिंदू व मुस्लिमांमध्ये तेढ करण्याचा एक छुपा अजेंडा आहे. तो असल्या पागल लोकांच्या तोंडातून बाहेर पडतो. सरकार एरवी बोलते आम्ही चौकशी करतोय. आता तर कुठल्या शोधाची आणि चौकशीची गरज नाही. बेशरमपणा करणारा माणूस समोर आहे. आता सरकारनं कारवाई करावी, असं आव्हाड म्हणाले.
महात्मा गांधी यांचे खरे वडील मुस्लिम जमीनदार होते. गांधीजींच्या आईला या जमीनदारानं पळवून नेलं होतं. माझ्याकडं याचे पुरावे आहेत, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी काल अमरावतीमधील एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं.