बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman khan house firing case ) वांद्रेतील घराबाहेर १४ एप्रिल रोजी गोळीबार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यातील अनुज थापन या आरोपीने काही दिवसांपूर्वी तुरुंगातच आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. आता मृत आरोपी अनुज थापनचा पोस्ट मार्टम अहवाल समोर आला असून यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
तुरुंगात आत्महत्या केलेल्या अनुज थापन याचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये त्याचा गळा आवळल्याचे व्रण दिसत आहेत. श्वास गुदमरुन त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्याचा मेंदू न्यूरोपॅथॉलॉजीसाठी ठेवला आहे. तसेच मृत अनुजचा व्हिसेरा रिपोर्ट राखून ठेवला आहे. दरम्यान अनुज थापनचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. मृतदेह पंजाबला नेऊन तेथे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
दरम्यान या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून मृत अनुज थापनच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेत सलमान खानवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर थापनच्या या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. थापनने आत्महत्या केली असून त्याच्या मृत्यूमागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप मृताचे कुटुंबीय आणि वकिलांनी केला असून याची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अनूजच्या कुटूंबीयांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत अनूजचा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर त्यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. अनुजच्या आईने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली असून यावर लवकरच सुनावणी होणार आहे.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, सलमान खान (Salman Khan) फायरिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने आत्महत्या केली. त्याचे नाव अनुज थापन असे आहे. गोळीबार करणाऱ्यांना बंदुक पुरवण्याचा त्याच्यावर आरोप आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्याला मुंबईतील जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचा मृत्यू झाला. थापन याला मुंबई पोलिसांनी अन्य एक आरोपी सोनू सुभाष चंदर (वय ३७) सोबत २५ एप्रिल रोजी पंजाबमधून अटक करण्यात आली होती.
संबंधित बातम्या