
अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील इमारतीवर रविवारी पहाटेच्या सुमारास २ दुचाकीस्वार हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून मुंबई पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. तीन संशयितांना पनवेलमधल्या हरिग्राममधील एका अपार्टमेंटमधून ताब्यात घेतलं.
अटक करण्यात आलेल्या तीन जणांनी सलमानच्या वांद्रेतील अर्पिता फार्म हाऊसवर हल्ला करण्याचा कट रचला होता. गेल्या अनेक दिवसांपासून ते पनवेलमधील हरिग्राम भागातील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये रहात होते. सलमानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार करणाऱ्यांनी वापरलेली बाईकही पनवेलमधून विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे.
रविवारी (१४ एप्रिल) पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या वांद्र्याच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांनी ५ ते ६ राऊंड फायर केले. यातील एक गोळी सलमान खानच्या गॅलरीवरही झाडण्यात आली. हल्लेखोरांनी हेल्मेट परिधान केल्याने त्यांचा चेहरा झाकला होता.
दोन हल्लेखोरांचे फोटो समोर आले असून यातील एकाची ओळख पटल्याचे सांगण्यात येत आहे. दोन हल्लेखोरांपैकी एकाने काळ्या रंगाच्या जॅकेटच्या आत पांढऱ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची टोपी घातली आहे. तर दुसऱ्याने लाल रंगाचा टी शर्ट राखाडी रंगाची टोपी घातली आहे. या दोघांच्याही खांद्यावर बॅगा दिसत आहे.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींना मुंबईच्या रस्त्यांची माहिती नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे आरोपी दुसऱ्या राज्यातून आल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आतापर्यंत ५० हून अधिक सीसीटीव्हींची पडताळणी केली आहे.
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर रविवारी पहाटे हल्ला झाला होता. या हल्ल्या प्रकरणी अनेक पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. हल्ला कुणी केला हे देखील तपासात निष्पन्न झाले आहे. या सोबतच त्यांनी वापरलेल्या दुचाकीबद्दल देखील माहिती मिळाली आहे. ही दुचाकी सेकंड हँड विकत घेण्यात आली असून ती रायगड येथून घेण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.
संबंधित बातम्या
