मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयातील (Saint George Hospital) कर्मचाऱ्यालाच वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना असून या प्रकरणी दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हे कारवाईचे आदेश दिले असून या प्रकरणी उद्या (गुरुवार) विधीमंडळात बैठकही बोलावण्यात आली आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. अनिश चव्हाण असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे.
अनिश सेंट जॉर्ज रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. फिट येऊन पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात डॉक्टर उस्थित नसल्याने या कर्मचाऱ्यावर वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. यामुळे त्याचा मृत्यू झाल्याच्या आरोप नातेवाईकांनी केला आहे. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर स्थानिक नागरिकांनी आणि मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी करत गोंधळ घातला. याची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले व नातेवाईकांना शांत केले. स हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांना आणि मृतक कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना शांततेचे आवाहन केलं. यानंतरप्रशासनाने कारवाई केली असूनयाप्रकरणी दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
अनिश हे घरी असताना चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. यानंतर नातेवाईकांनी त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातच उपचारासाठी आणले. पण वरिष्ठ डॉक्टर हॉस्पिटलमध्ये नसल्याने त्यांना दोन ते अडीच तास उपचारच मिळाले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर सेंट जॉर्ज रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच डीन पल्लवी सापळे रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी म्हटले की, यात दोषींवर कारवाई केली जाईल. जेव्हा मी रुग्णालयात आलो तेव्हा RMO येथे नव्हते. प्रत्येकाला उपचार देण्याचं काम रूग्णालयातील डॉक्टरांचं आहे. रूग्णालयात घडलेल्या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे.