बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून त्यांच्यावर चाकूने वार करणाऱ्या हल्लेखोराचा पहिला फोटो समोर आला आहे. गुन्हा केल्यानंतर जिन्यावरून खाली उतरताना संशयित थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघताना दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर रात्री उशीराचाकूहल्ला झाल्याची बातमी समोर आली. या बातमीमुळे बॉलिवूडमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाआहे. अभिनेता सैफ अली खानच्या बंगल्यातील आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून या प्रकरणात आता पोलिसांना एक मोठा पुरावा सापडला आहे. पोलिसांना संशयित आरोपी सैफ अली खानच्या घरातून पायऱ्या उतरत असलेला एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
सैफ अली खान याच्या वांद्रे येथील १२ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घुसखोराने त्याच्यावर चाकूने वार केले होते. इमर्जन्सी शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खान (५४) यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
घुसखोराने अपार्टमेंटमध्ये प्रवेश करताच सैफ अली खानच्या घरातील मोलकरणीने प्रथम आरडाओरडा केला. या झटापटीत तिच्या हाताला किरकोळ जखम ही झाली. मदतीसाठी महिलेचा आरडाओरडा ऐकून खान बाहेर आल्याने खान आणि घुसखोर यांच्यात भांडण झाले.
प्राथमिक तपासानुसार, घुसखोराने अभिनेत्याच्या फ्लॅटमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला नाही किंवा फ्लॅट तोडला नाही, तर रात्रीच्या वेळी कधीतरी घुसला असण्याची शक्यता आहे.
घटनेनंतर खान यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रिक्षातून लीलावती रुग्णालयात नेले. रुग्णालयाचे मुख्य ऑपरेशन ऑफिसर डॉ. नीरज उत्तमणी यांनी माध्यमांना सांगितले की, अभिनेत्याला दोन खोल जखमांसह सहा जखमा झाल्या आहेत. त्याच्या मणक्याजवळ अडकलेला चाकू काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली.
त्याला सहा जखमा झाल्या आहेत, दोन किरकोळ आहेत, दोन मध्यम आणि दोन खोल जखमा आहेत, एक जखम पाठीच्या मणक्याजवळ आहे. चाकूमुळे सैफच्या मणक्याला मोठी दुखापत झाली... चाकू काढण्यासाठी आणि पाठीच्या कण्यातील गळती दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली, असे डॉक्टरांनी सांगितले.
त्याच्या डाव्या हाताला आणि मानेच्या उजव्या बाजूला दोन खोल जखमा होत्या ज्या प्लास्टिक सर्जरी टीमने दुरुस्त केल्या. त्यांची प्रकृती स्थिर असून तो पूर्णपणे धोक्याबाहेर आहेत. अभिनेत्याला आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते, परंतु एका दिवसानंतर त्याला सामान्य वॉर्डमध्ये हलविण्यात येईल.
अभिनेत्याच्या प्रतिनिधींनी या घटनेचे वर्णन 'घरफोडीचा प्रयत्न' असे केले आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३११ (जीवे मारण्याचा प्रयत्न करून दरोडा), ३३१ (४) (रात्री घरफोडी किंवा घुसखोरी) आणि इतर संबंधित कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या घटनेनंतरही मुंबई एक सुरक्षित शहर आहे. देशातील मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित आहे, असे मला वाटते. काही घटना कधी कधी घडतात हे खरे आहे आणि त्या गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. पण अशा घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे, असे म्हणणे योग्य नाही. परंतु, शहर सुरक्षित करण्यासाठी सरकार नक्कीच प्रयत्न करेल, असे ते म्हणाले.
संबंधित बातम्या