चोरट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अभिनेता सैफ अली खान याला काही दिवसांतच डिस्चार्ज मिळाला आणि तो नेहमीच्या स्टाइलनं स्वत: चालत घरी पोहोचला. रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात पोहोचलेला सैफ इतक्या लवकर बरा कसा झाला, अशी शंका शिंदे गटाचे संजय निरुपम यांनी उपस्थित केली आहे. त्या रात्री नेमकं काय झालं होतं हे कोणी सांगेल का, अशी विचारणा निरुपम यांनी केली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून संजय निरुपम यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. 'डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरानं मारलेला चाकू सैफ अली खानच्या पाठीत २.५ इंच आत घुसला होता. चाकूचा तुकडा शरीरात अडकला होता. या हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत सैफ रुग्णालयात गेला अशा बातम्या होत्या. त्यानंतर सलग सहा तास त्याच्यावर ऑपरेशन सुरू होतं. हा सगळा प्रकार १६ जानेवारी रोजी घडला आणि २१ जानेवारी रोजी तो टणाटण उड्या मारत घरी पोहोचला. हॉस्पिटलमधून बाहेर पडताच एकदम फिट! फक्त पाच दिवसांत हे कसं झालं? कमाल झाली, असा आश्चर्य निरुपम यांनी व्यक्त केलं.
निरुपम यांनी या संदर्भात वृत्तवाहिन्यांशीही संवाद साधला. 'सैफ शारीरिकदृष्ट्या खूप फिट आहे. तो नियमित जिममध्ये जातो हे सगळं ठीक आहे, पण तरीही प्रश्न उरतातच, असंही निरुपम म्हणाले. १६ जानेवारीच्या रात्री नेमकं काय झालं होतं. त्या आरोपीचे सीसीटीव्ही फूटेज का जाहीर केले जात नाहीत? रक्तबंबाळ अवस्थेत सैफ जातानाचे सीसीटीव्ही फूटेज का दाखवले जात नाहीत? ती घटना खरंच किती मोठी आणि तीव्र होती हे का कळू दिलं जात नाही? आम्हाला कोणाच्याही कौटुंबिक आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही पण या घटनेमुळं मुंबईकर धक्क्यात आहेत. इमारतींमध्ये राहणारे लोकही टेन्शनमध्ये आहेत. त्यामुळंच वस्तुस्थिती समोर यायला हवी, असं निरुपम म्हणाले.
संजय निरुपम यांनी सैफ अली खानच्या प्रकृतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करताच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आनंद दुबे यांनी निरुपम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'संजय निरुपम यांना मानसिक उपचारांची गरज आहे. निरुपम यांनी लीलावतीमध्ये जाऊन उपचार करून घ्यावेत. आम्ही धर्मादाय माध्यमातून पैसे गोळा करू त्यांचा खर्च करू. स्वत:च्या पक्षाच्या सरकारच्या अखत्यारित असलेल्या पोलिसांवरही ते प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहेत, असं दुबे म्हणाले.
‘लीलावतीमध्ये उत्तम डॉक्टर आहेत. महाविद्यालयीन काळापासून फिट असलेला हा अभिनेता चित्रपटात फिट दिसतो आणि क्रिकेट, गोल्फ आणि घोडेस्वारी खेळताना दिसतो. त्यामुळं अनावश्यक प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही,’ असं आनंद दुबे म्हणाले.
संबंधित बातम्या