sadhu vaswani flyover : पुण्यातील साधूवासवानी उड्डाण पूल धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्यामुळे या पूलावरील वाहतूक ही बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. दरम्यान, हा पूल पाडण्यात येणार असून लवकरच याची तारीख जाहीर केली जाईल, असे महानगर पालिकेने स्पष्ट केले आहे.
पुण्यातील साधूवासवानी पूलाला ५० वर्ष पूर्ण झाले आहे. हा पूल जीर्ण झाला आहे. दरम्यान, या पूलाची डागडुजी करून या पुलाचे आयुर्मान वाढवण्याचे प्रयत्न महानगर पालिकेने केले होते. मात्र, हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल काही संस्थांनी दिला होता. त्यामुळे या पुलावरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच हा पूल पाडण्यात येणार असून प्रायोगिक तत्त्वावरती ६ जानेवारीपासून पुढील दहा ते पंधरा दिवस या मार्गाची वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
गेल्या वर्षभरापासून या पुलाच्या डागडुजीचे काम सुरू होते. मात्र, असे असतांनाही स्लॅबचे सिमेंट खाली पडत होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने हा पुल पाडण्यात येणार आहे.
सध्या पुणे महापालिकेने हा पुल जड वाहतुकीसाठी बंद केला आहे. यामुळे नगर रोड कोरेगाव पार्क, बंडगार्डन, कौन्सील हॉल, मोरवाडा या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. काही रस्त्यावर एकरी वाहतुक तर काही रस्त्यावर नो एन्ट्री करण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती पुणे पोलीसचा वाहतुक विभाग जाहीर करणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत आंबेकर यांनी दिली.