Maharashtra assembly election 2024: मुंबई मधील माहिम मतदारसंघात सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिल्यानं येथे तिरंगी लढतहोणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आज (सोमवार) उमेदवारी मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. माहिम मतदारसंघातून कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार, याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र अर्ज माघारीची मुदत संपेपर्यंत कोणीच माघार न घेतल्यानं येथे तिरंगी लढत अटळ झाली आहे.
माहिममधून उमेदवारी मागे कोण घेणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. आज शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. परंतु राज ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारली. त्यानंतर सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.
सदा सरवणकर यांनी सांगितले की, माझा मुलगा समाधान सरवणकर आणि अन्य चार प्रतिनिधी राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते. माझे वडील तुमच्याशी बोलू इच्छितात असे राज ठाकरेंना सांगितले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला तुमच्याशी चर्चा करायला सांगितलंय,असे समाधान सरवणकर यांनी सांगितले. पण मला काही बोलायचं नाही. असे राज ठाकरे त्यांना म्हणाले. मात्र त्यांनी मला काहीही बोलायचं नाही म्हणत भेटसुद्धा नाकारल्याची माहिती सदा सरवरणकर यांनी दिली.
सरवणकर म्हणाले की,राजसाहेब आज घरी होते. त्यामुळे म्हटलं आज भेट होईल. दिलखुलास माणूस, नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आम्ही जात असल्याने ते आम्हाला भेटतील असं वाटत होतं, पण ते आज वेगळ्या मनस्थितीत होते, ते भेटण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी आदर आजही आहे. ही लढाई आता जनतेची झाली आहे, मतदारराजाची झाली आहे. मतदारराजाला जे वाटेल ते तो आता करेल. काय वाटेल ते करा मला भेटायची इच्छा नाही असा निरोप आला.
मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. काही समीकरणं त्यांना समजवावीत असं मला वाटलं होतं पण त्यांनी भेट नाकारली. तुम्हाला उभं राहायचंय तर उभ राहा. मला कोणाशीच बोलायचं नाही,असे राज ठाकरे म्हणाले. पुढे काय करायचं हे मतदार ठरवतील. राज ठाकरे काय बोलले असते तर त्यांच्या शब्दाचा मान ठेवला असता. राज ठाकरे हे वरिष्ठ नेते आहेत. पण त्यांनी भेटच नाकारली.
मुंबईत महायुतीच्या विरोधातील सर्व उमेदवार मनसे मागे घेणार असेल तर आपण अडून राहणार नसल्याचे सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे. मात्र आता राज ठाकरे यांच्यासोबत भेट न झाल्याने त्यांनी माघार घेतली नसल्याचं स्पष्ट झालं. मी महायुतीचा उमेदवार असल्याने महायुतीचे सर्व नेते मला पाठींबा देतील, असा विश्वास सदा सरवणकर यांनी व्यक्त केला.