abdul sattar : महायुतीत राडे! अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून हाकला; भाजप पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ नेत्यांकडं मागणी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  abdul sattar : महायुतीत राडे! अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून हाकला; भाजप पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ नेत्यांकडं मागणी

abdul sattar : महायुतीत राडे! अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून हाकला; भाजप पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ नेत्यांकडं मागणी

Updated Jun 14, 2024 05:22 PM IST

Jalna BJP against abdul sattar : लोकसभा निवडणुकीतील पीछेहाटीनंतर राज्यातील महायुतीमध्ये वाद सुरू झाले आहेत. जालना येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे.

अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून हाकला; खवळलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ नेत्यांकडं मागणी
अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून हाकला; खवळलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ नेत्यांकडं मागणी (HT)

Jalna BJP against abdul sattar : जालना लोकसभेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप स्थानिक नेत्यांनी केला आहे. महायुतीशी विश्वासघात करणाऱ्या सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी जालना जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी केली आहे. त्यामुळं महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं चित्र पुढं आलं आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप, शिंदे गट व अजित पवार गटाच्या महायुतीचा दारुण पराभव झाला. या महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीनं ३० जागा जिंकत मुसंडी मारली. तेव्हापासून महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. तिन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अजित पवारांशी युती भाजपला नडल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हटल्यानंतर आता जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या अब्दुल सत्तार यांना लक्ष्य केलं आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपच्या तीन केंद्रीय मंत्र्यांचा पराभव झाला. त्यात जालन्यातून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे. त्यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला होता. हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का होता. दानवे यांच्या पराभवास सत्तार जबाबदार आहेत, असा आरोप भाजपचे सिल्लोड नगर विभाग प्रमुख कमलेश कटारिया यांनी केला आहे.

कटारिया यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिलं आहे. त्यात सत्तार यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. सत्तार व त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांना मदत केल्याचा आरोप कटारिया यांनी केला आहे. 

सिल्लोडमध्ये सत्तार भाजपला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत असून भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सत्तार आणि त्यांच्या समर्थकांवर पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत. पक्षाच्या फायद्यासाठी आम्ही हे आतापर्यंत सहन केलं. आता सहन करण्यापलीकडं गेलं आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन सत्तार यांची राज्याच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

आजच्या बैठकीकडं लक्ष

मुंबईत आज महाराष्ट्र भाजपची बैठक होत आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत निकालांचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर