मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sachin Dharmadhikari : सद्गुरू परिवाराचे सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट देऊन सन्मान

Sachin Dharmadhikari : सद्गुरू परिवाराचे सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट देऊन सन्मान

Mar 05, 2023 08:36 PM IST

Sachin Dharmadhikari DLitt : सद्गुरू परिवाराचे सामाजिक सेवेची परपंरा पुढं नेणारे सचिन धर्माधिकारी यांना आज डी.लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं.

Sachin Dharmadhikari
Sachin Dharmadhikari

Sachin Dharmadhikari DLitt : राजस्थान येथील श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीबरेवाला विद्यापीठच्या वतीनं सद्गुरू परिवाराचे सचिनदादा धर्माधिकारी यांना निस्वार्थी समाज कार्याबद्दल आज मानद डॉक्टरेट पदवीनं (डी लिट) सन्मानित करण्यात आलं. वाशीतील सिडको एक्झिबीशन सेंटर इथं आयोजित या सोहळ्याला हजारो समर्थभक्त उपस्थित होते.

ट्रेंडिंग न्यूज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: या सोहळ्याला उपस्थित होते. सचिन धर्माधिकारी यांच्या कार्याचं तोंडभरून कौतुक करतानाच डी लिट मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. 'आज कोणी गडगंज श्रीमंत असेल, तर ते सचिनदादा आहेत. कारण नानासाहेब आणि अप्पासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढं नेण्याचं काम ते करत आहेत. सचिनदादांना डी लिट या पदवीनं सन्मानित करणं म्हणजे सद्गुरु परिवाराच्या प्रत्येक सदस्याचा सन्मान आहे. जगात अनेक विद्यापीठं असली तरी माणूस घडविणारं खरं विद्यापीठ हे रेवदांड्याला आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

'आपण सर्व भाग्यवान आहोत. कारण आपल्याला नानासाहेब आणि अप्पासाहेबांसारख्या महान व्यक्तींचा सहवास मिळाला. मी देखील आपल्याच परिवाराचा सदस्य आहे. मला योग्य मार्गदर्शन, प्रेरणा आणि सतत काम करण्याची उर्जा अप्पासाहेबांकडून मिळते. माझा मानसिक ताणतणाव वाढतो त्यावेळी मी देखील बैठकीस जातो. बैठकीतून समाधान प्राप्त होते. ज्यांच्यावर संकटं येतात, दु:ख येतात त्यांना दिशा आणि मार्गदर्शन देण्याचं काम अप्पासाहेबांनी केलं आहे, असं शिंदे म्हणाले.

'धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात सामाजिक कामं केली जातात. ज्या ठिकाणी शासन पोहोचत नाही, त्या ठिकाणी प्रतिष्ठानाचे सदस्य पोहोचतात. जगदीशप्रसाद झाबरमल टीबरेवाला विद्यापीठानं सचिनदादांच्या समाज कार्याची दखल घेऊन खऱ्या व्यक्तिमत्वाला पदवी बहाल केली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री शिंदे यांनी काढले.

यावेळी पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीबरेवाला विद्यापीठचे अध्यक्ष डॉ. विनोद टीबरेवाला, डॉ. सचिनदादा धर्माधिकारी, सौ. स्वरुपा सचिनदादा धर्माधिकारी, केंद्रीय मंत्री पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार पूनम महाजन, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नवीमुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, विशाल टीबरेवाला, उमा विशाल टीबरेवाला आदी उपस्थित होते.

D Litt
D Litt

आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले…

'साधूसंतांचे विचार मिळाले की, मानवी जीवन समाधानी होते. बैठकीत जाणाऱ्यांना काय मिळते, तर मानसिक समाधान मिळते. समाजाला प्रबोधनाची आवश्यकता आहे. अंत:करणाची स्वच्छता केल्याशिवाय समाजाची, परिसराची आणि निसर्गाची स्वच्छता करता येणार नाही. मानवता धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. समाजाचं ऋण फेडण्यासाठी आपण काही तरी केलं पाहिजे. दिवसभरात आपण समाजासाठी काय केलं याचं रोज आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, असं अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले.

असा समारंभ याआधी पाहिला नाही!

आम्ही आतापर्यंत १८ राज्यपाल, अभिनेत्री हेमा मालिनी, बासरी वादक हरीप्रसाद चौरसीया, इस्कॉनचे सुरदास प्रभु अशा नामवंत प्रसिद्ध व्यक्तींचा सन्मान केला आहे. हा आमच्या विद्यापीठाचा ९ वा दीक्षांत समारंभ आहे. परंतु असा समारंभ यापूर्वी कधीच झाला नाही. इतक्या मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती मी पहिल्यांदाच पाहिली. आमच्या विद्यापिठात स्वच्छतेचे कार्यक्रम केले जातात त्यासाठी आम्ही धर्माधिकारी प्रतिष्ठानचे मार्गदर्शन घेऊ, असं श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीबरेवाला विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विनोद टीबवारेवाला यांनी यावेळी सांगितलं.

आणखी प्रेरणा मिळाली - सचिन धर्माधिकारी

डिलीट पदवी दिल्याबद्दल सचिन धर्माधिकारी यांनी आभार व्यक्त केले. श्री नानासाहेब धर्माधिकारी व श्री आप्पासाहेब धर्माधिकारी हे खरे विद्यापीठ असून त्यांचा सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्यासाठी अशा सन्मानामुळं आणखी प्रेरणा मिळाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सचिन यांच्या पत्नी स्वरूपा यांनीही मनोगत व्यक्त केलं.

WhatsApp channel
विभाग