saamana praises rahul gandhi : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लोकसभेत सत्ताधारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला घेरणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून जोरदार कौतुक करण्यात आलं आहे. 'मोदी, शहा, राजनाथ सिंह, किरेन रिजिजू, रविशंकर प्रसाद, भूपेंद्र यादव हे एका बाजूला व दुसऱ्या बाजूला ‘एक अकेला’ राहुल गांधी या सगळ्यांवर भारी पडले. मोदींची त्यांच्या तोंडावर इतकी फजिती कुणी केली नसेल, असं सामनात म्हटलं आहे.
देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर संसदेचं पहिलं अधिवेशन सुरू आहे. पहिल्याच अधिवेशनात राहुल गांधी यांनी आक्रमक होत सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरलं. राहुल यांच्या शाब्दिक माऱ्यामुळं अमित शाह यांना अध्यक्षांकडून संरक्षणाची मागणी करावी लागली. हाच धागा पकडून 'सामना'नं 'एक अकेला मोदी-शाह पर भारी' या शीर्षकाखाली अग्रलेख लिहिला आहे. त्यात राहुल यांचं कौतुक करतानाच मोदी, शाह व भाजपवर तोफा डागण्यात आल्या आहेत.
> मोदी–शहांचा अहंकार संसदेत चूर करण्याचं काम राहुल गांधी यांनी केलं. ईडी, सीबीआयचा दुरुपयोग करून संपूर्ण विरोधी पक्षाला मोदी–शहा घाबरवत राहिले. आता विरोधी पक्षनेते झालेल्या राहुल गांधींना रोखा, त्यांच्यापासून संरक्षण द्या, अशी याचिका लोकसभा अध्यक्षांकडे करण्याची वेळ या अहंकाऱ्यांवर आली. काळानं घेतलेला हा सूड आहे. मोदी–शहांना यापेक्षा वाईट दिवस भविष्यात पाहावे लागणार आहेत. गांधी यांना थांबवणे आता सोपे नाही.
> राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना राहुल गांधी यांनी मोदी यांच्या देवत्वाचा शेंदूर खरवडून काढला. तुम्हाला हिंदुत्व कळलंच नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, असं राहुल म्हणाले. तेव्हा मोदींचा चेहरा पाहण्यासारखा झाला. मोदी-शहांच्या मैदानात शिरून त्यांना अशा पद्धतीनं कोणीच सुनावलं नव्हतं.
> दहशत व पाशवी बहुमताच्या बळावर या जोडगोळीनं संसद आपल्या टाचेखाली ठेवण्याचा प्रयत्न केला, पण गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत विरोधी पक्ष लोकसभेत अवतरताच हिंदुत्वाच्या नावावर मनमानी करणाऱ्यांचा टांगा पलटी झाला आहे.
> गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनाही आरसा दाखवला. विरोधी पक्षनेते म्हणून मी तुमच्याशी हस्तांदोलन केलं, तेव्हा तुम्ही भलत्याच ताठ कण्यानं उभे होता, पण मोदींशी हात मिळवताना तुम्ही सपशेल वाकलात. म्हणजे लोकशाहीच वाकली असं म्हणावं लागेल.
> गांधी यांच्या हल्ल्यामुळं संसदेतील प्रतिष्ठित चमचे व अंधभक्त उताणेच पडले. एकाच फटक्यात शंभरावर खासदारांचं निलंबन करून मोकळ्या सभागृहात महत्त्वाचे कायदे मंजूर करून घेणाऱ्या लोकसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेत्यानं जे खडे बोल सुनावले, त्यामुळं गेली दहा वर्षे मरगळलेल्या संसदेच्या भिंतींनाही जाग आली.
> ‘आपण बायोलॉजिकल नसून परमेश्वराचे पुत्र आहोत असं म्हणणाऱ्या मोदींची राहुल यांनी चांगलीच खिल्ली उडवली. मोदीजी, नोटाबंदी करण्याचा संदेश थेट वरून देवाकडून आला काय? मुंबई विमानतळ अदानी यांना देण्यासाठीसुद्धा वरूनच ऑर्डर आली असेल खटाखट खटाखट.’ यावर मोदी-शहांना लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण मागण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
> संसदेत नरेंद्र मोदी हे स्वतःच्या कर्माने चेष्टेचा विषय झाले. मोदी हे जोडतोड करून पंतप्रधान झाले असले तरी त्यांच्या नेतृत्वास उतरती कळा लागली आहे. गांधी यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. अयोध्येत मोदी हे निवडणू लढवणार होते मात्र सर्व्हे त्यांच्या विरोधात गेल्यामुळं ते पुन्हा वाराणसीत गेले, असा गौप्यस्फोट राहुल यांनी केला. मोदी यांच्या तोंडावर इतकी फजिती कोणीच केली नसेल.
'मोदींचं हिंदुत्व हे नफरत आणि हिंसा फैलावणारं आहे. हिंदू-मुसलमानांत भांडणं लावणारं आहे, पण पंतप्रधान मोदी एकदाही हिंसाचारग्रस्त मणिपुरात गेले नाहीत. भाजप भय आणि द्वेषाचे विष पसरवतो. हा राष्ट्रवाद नाही आणि हिंदुत्व तर नाहीच. हिंदुत्व हे संस्कारी आणि सुसंस्कृत आहे. हा संस्कार भाजपमध्ये नाही. मोदी यांना निवडणूक प्रचारात ‘मुजरा’ आठवला. मुसलमान तुमच्या बायकांच्या गळ्यातील मंगळसूत्रं खेचतील. तुमच्याच दारात दोन म्हशी असतील तर एक म्हैस घेऊन जातील, अशी उटपटांग भाषणं करूनही मोदी यांना हिंदूंची मतं मिळाली नाहीत. महाराष्ट्र, प. बंगाल, केरळ, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत त्यांचा सपशेल पराभव झाला. मोदी यांचं नकली हिंदुत्वाचं नाणं अजिबात चाललं नाही व सोमवारी संसदेत राहुल गांधी यांनी मोदी-शहांना नामोहरम केलं, असं अग्रलेखात शेवटी नमूद करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या