Shiv Sena UBT attacks BJP : ‘रामाचं नाव घेऊन देशाला फक्त ‘मोदी मोदी’ करायला लावणं हाच अयोध्या उत्सवाचा भाजपचा उद्देश दिसतो. या ढोंगबाजीचा मुखवटा उतरवण्यासाठी आज शिवसेनाप्रमुख हवेच होते, अशा शब्दांत 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. 'बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेमुळंच महाराष्ट्र आजही दिल्लीतील नव्या मोगलशाहीविरुद्ध लढतोय,’ असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'मध्ये 'बाळासाहेब असते तर जंगलराज पेटवले असते' अशा शीर्षकाखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे. यात बाळासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतानाच भाजपच्या सध्याच्या राजवटीवर तोफ डागण्यात आली आहे. भाजपच्या राजवटीला जंगलराज असं संबोधण्यात आलं आहे.
> शिवसेनाप्रमुखांचे अस्तित्व हे सत्य व नैतिकतेच्या राजकारणाचं बलस्थान होतं. आज आपल्या देशातून सत्य आणि नैतिकतेचं उच्चाटन झालं आहे व राष्ट्रभक्तीचा गोवर्धन करंगळीवर पेलून धरायला शिवसेनाप्रमुख नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनंतरही महाराष्ट्र मोगलांशी लढत राहिला व शेवटी औरंगजेबाला याच मातीत गाडले. शिवसेनाप्रमुखांच्या महानिर्वाणानंतरही महाराष्ट्र लढतच आहे व महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्या नव्या मोगलांना तो याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही.
> शिवसेनाप्रमुख ही पदवी किंवा उपाधी नव्हती, तर ते एक तेजोवलय होते. सत्तेपेक्षा संघटनेचे बळ किती मोलाचं व संघटनेत काम करणाऱ्या शिवसैनिकांच्या निष्ठा व त्याग किती महत्त्वाचा, हे त्यांनी देशाला दाखविलं. लाखो निष्ठावंतांचा सागर त्यांच्या एका इशाऱ्यावर उसळून बाहेर पडत असे व देशाच्या राजकारणाची दिशा त्यामुळं बदलत असे. हा इतिहास कधीच पुसला जाणार नाही.
> ‘शिवसेनाप्रमुख’ या पदातील शिवसेना मोदी-शहांच्या भाजपनं सध्या महाराष्ट्रद्रोही गुलामांच्या हाती सोपवली आहे. सत्तेच्या क्षणिक तुकड्यांसाठी ‘आई’चा सौदा करावा तसा शिवसेनेचा सौदा ज्यांनी केला त्यांच्या हस्ते अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. हे बरं नाही.
> शिवसेना हा महाराष्ट्राचा, हिंदुत्वाचा पंचप्राण. त्या प्राणांच्या प्राणप्रतिष्ठेस ज्यांनी धक्का पोहोचवला त्यांचं भविष्य हे अंधःकारमयच आहे. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, मराठी अस्मितेसाठी शिवसेनेची निर्मिती बाळासाहेब ठाकरे यांनी केली. पण महाराष्ट्राची लूट विनासायास करता यावी यासाठी बाळासाहेबांची शिवसेना ‘गुजरात लॉबी’नं फोडली, पण शिवसेना संपली काय? ती महाराष्ट्राच्या कणाकणांत आहे, मनामनात आहे.
> श्रीरामाच्या हाती आज धनुष्यबाण आहे. उद्या रामाच्याच हाती मशाल येईल. त्या मशालीच्या प्रखर प्रकाशात भगवान राम शिवसेनेचं भवितव्य आणि मार्ग अधिक प्रकाशमान करतील.
> छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हिंदूंची सुंता झाली असती. काशी-मथुरेच्या मशिदी झाल्या असत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते तर मराठी माणूस कायमचा गुलाम झाला असता. मुंबईचा महाराष्ट्रापासून तुकडा पडला असता. महाराष्ट्राचा स्वाभिमान मातीमोल झाला असता. महाराष्ट्र आजही दिल्लीतील नव्या मोगलशाहीविरुद्ध लढत आहे तो फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेमुळेच!
> आज सर्व राष्ट्रीय संस्था, न्यायालये, संविधानाचे चौकीदार, निवडणूक आयोग, राजभवन सरकारच्या हातातील बाहुले बनून कठपुतळ्यांसारखे नाचत आहेत. देश इराणच्या खोमेनीप्रमाणे धर्मांधता आणि उन्मादाच्या दिशेनं निघाला आहे. राष्ट्रवादाच्या व्याख्या बदलल्या आहेत. पाकिस्तानबरोबर चीनही दुष्मन बनून छातीवर बसला आहे.
> हिंदुत्व म्हणजे खोमेनी छाप धर्मांधता नाही, असा विचार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला होता. पण देश ‘राममय’ करताना त्या हिंदुत्वात धर्मांधतेची अफू मिसळली जात असेल तर हा महान भारत देश पुन्हा जंगलयुगात जाईल. देशाचं जंगल होताना पाहणं दुर्दैव आहे.
संबंधित बातम्या