'आपल्या कार्यात प्राविण्य मिळविणाऱ्या व्यक्तीला देव मानायचे की नाही, हे लोकच ठरवतात. त्यामुळे तुम्ही स्वतःला देव म्हणू नका…' असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल, गुरुवारी पुण्यात केले. पूर्व सीमा प्रतिष्ठानच्या वतीने संघप्रचारक दिवंगत शंकर दिनकर काणे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते.
काणे यांच्या कार्याचा उल्लेख करताना भागवत म्हणाले, ‘आपण आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण चमकू नये किंवा उभं राहू नये, असं कुणीच म्हणत नाही. कामाच्या माध्यमातून प्रत्येकजण पूजनीय व्यक्तिमत्त्व बनू शकतो. पण आपण त्या पातळीवर पोहोचलो आहोत की नाही हे स्वत:हून नव्हे तर इतरांकडून ठरवले जायला हवं. आपण देव झालो आहोत, असं स्वतः म्हणू नये’ असं भागवत म्हणाले.
मणिपूरमधील सद्यस्थिती अतिशय बिकट असल्याचे भागवत म्हणाले. 'स्थानिक नागरिकांना त्यांच्या सुरक्षेची खात्री वाटत नाही. जे लोक व्यवसाय किंवा सामाजिक कामासाठी मणिपूरला गेले आहेत त्यांच्यासाठी तर परिस्थिती अधिकच आव्हानात्मक आहे. मणिपूरमध्ये दोन्ही समुदायांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे मोठ्या संख्येने जीवितहानी झाली असून लोक विस्थापित झाले आहेत. अशा परिस्थितीतही संघाचे स्वयंसेवक खंबीरपणे उभे राहून दोन्ही गटांची सेवा करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे भागवत म्हणाले. संघाच्या कार्यकर्त्यांनी मणिपूर सोडलेले नाही किंवा निष्क्रिय राहिले नाही, असं भागवत म्हणाले.
देवाने मला काही विशिष्ट उद्दिष्टासाठी पाठवले आहे आणि ते पूर्ण होईपर्यंत मी काम करत राहिन, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मे २०२४ रोजी एका मुलाखतीत केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांची वरील प्रतिक्रिया महत्वाची मानली जात आहे. मोहन भागवत पुढे म्हणाले की, ‘ मी देव आहे अशी भावनाही काही जणांना जाणवत आहे. मात्र तुमच्यातील देवत्व लोकांनी ठरवावे.माझ्याबाबतीत कुणी असे शब्द उच्चारले तर मी ते कानापर्यंत येऊ देतो मात्र मानापर्यंत पोहचू देत नाही ’ असं भागवत यांनी या कार्यक्रमात सांगितलं.