मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोहन भागवतांच्या विधानावर पटोले म्हणाले, याच लोकांनी महाराजांची काय गत केली होती हे महाराष्ट्र विसरलेला नाही!

मोहन भागवतांच्या विधानावर पटोले म्हणाले, याच लोकांनी महाराजांची काय गत केली होती हे महाराष्ट्र विसरलेला नाही!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 02, 2023 05:55 PM IST

Nana Patole on Mohan Bhagwat : शिवरायांचं हिंदवी स्वराज्य हे हिंदू राष्ट्रच होतं असा दावा करणाऱ्या मोहन भागवत यांच्यावर नाना पटोले यांनी खोचक टीका केली आहे.

Mohan Bhagwat - Nana patole
Mohan Bhagwat - Nana patole

Nana Patole on Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या स्वराज्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. शिवरायांच्या नावाचा कोणी राजकीय फायदा उठवत असेल तर छत्रपतींच्या मावळ्यांना त्यातील बारकावा कळतो, असं सणसणीत टोला पटोले यांनी हाणला आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पष्टपणे राष्ट्राच्या स्वत्वाची घोषणा केली होती आणि आम्ही इथे हिंदवी स्वराज्य स्थापन करू, असं जाहीर केलं होतं. त्यांचं हिंदवी स्वराज्य म्हणजेच 'हिंदू राष्ट्र’ असा दावा भागवत यांनी काल संघाच्या स्वयंसेवकांसमोर बोलताना केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.

नाना पटोले यांनीही यावर भाष्य केलं आहे. 'सरदाराच्या पोराला राजा बनण्याची वेळ आली, त्यावेळी याच लोकांनी महाराजांची गत काय केली होती हे महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारं होतं. कोणी त्याचा राजकीय फायदा उठवत असेल तर छत्रपतींच्या मावळ्यांना त्यातील बारकावा कळतो. महाराजांना ज्यांनी त्रास दिला, तो त्रास मावळे विसरलेले नाहीत. सरसंघचालकांच्या विधानावर यापेक्षा जास्त चर्चा करण्याची गरज वाटत नाही, असं ते म्हणाले.

भाजपविरोधात मोठा असंतोष

टिळक भवनात होत असलेल्या दोन दिवसांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पटोले पत्रकारांशी बोलत होते. कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. ३० मतदारसंघात भाजपाच्या महत्वाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. देशभर काँग्रेस हाच पर्याय असून भाजपविरोधात जनतेत मोठा असंतोष आहे. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर सर्वात जास्त ४८ जागा असणारं राज्य आहे. या प्रत्येक जागेवर विजयी होण्यासाठी काय करता येईल याची व्यूहरचना या बैठकीत ठरवली जाणार आहे. मविआचे घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट पक्षालाही जागा वाटपावेळी विचारात घेतलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

IPL_Entry_Point