Lok Sabha Elections 2024: भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) देशात १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान होईल आणि ४ जून रोजी निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा करीत आदर्श आचारसंहिता (Model Code of Conduct) लागू केली. तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. आचारसंहिता काळात ५० हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगता येत नाही. यातच भरारी पथकाने नागपूरमध्ये (Nagpur) लाखोंची रोकड जप्त केल्याची माहिती दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसएसटी आणि नागपूर ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने एकूण 10 लाख 35 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. नागपूर चंद्रपूर महामार्गावर एका स्कॉर्पिओ गाडीतून रोकड जप्त केली. ही रोकड कोणत्या कामासाठी वापरली जाणार होती, याचा पोलीस तपास करीत आहेत. याचा आगामी लोकसभा निवडणुकीशी काही संबंध आहे का? हे देखील पाहिले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी निवडणूक आयोग सतर्क झाले आहे. इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवर आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेवर तीन पथक तैनात करण्यात आले आहे.
पुण्यात एकूण ६५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. भोसरी आणि शिरूर येथे खाजगी वाहनातून रोकड घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही वाहनांची तपासणी केली. भोसरी पोलिसांनी एका फॉरच्यूनर गाडीतून १३ लाख ९० हजार ५०० रुपये जप्त केले. तर, शिरूर पोलिसांना एका वाहनात ५१ लाख १६ हजारांच्या नोटा मिळाल्या. प्राप्तीकर विभागाच्या चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताची गैरप्रकार घडू नये, यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे.
संबंधित बातम्या