आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि इतर राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पक्षांकडून आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जात आहे. अशातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे देखील विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या आरपीआय पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत किमान १० ते १२ जागा मिळाव्यात, अशी मागणी रामदास आठवले यांनी भाडपकडे केली आहे. पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, ‘आरपीआय आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार असून उत्तर नागपूर, उमरेड (नागपूर), यवतमाळमधील उमरखेड, वाशीमसह विदर्भातील तीन ते चार जागांची मागणी करणार आहे.’
आठवले यांचा पक्ष भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महायुतीत आहे. आरपीआयने १८ संभाव्य जागांची यादी तयार केली असून, येत्या काही दिवसांत ती महायुतीच्या घटक पक्षांसोबत वाटून घेणार असून जागावाटपात किमान १० ते १२ जागा मिळतील, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून प्रत्येकी चार जागा आपल्या पक्षाला द्याव्यात. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा महायुती सरकारमध्ये समावेश झाल्याने आश्वासन देऊनही आरपीआयला राज्यात कोणतेही मंत्रिपद मिळाले नसल्याचा दावा आठवले यांनी पालघरमध्ये केला होता. पक्षाला कॅबिनेट पदे, दोन महामंडळांचे अध्यक्षपद, जिल्हास्तरीय समित्यांमध्ये भूमिका देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अजित पवारांच्या समावेशामुळे हे सर्व होऊ शकले नाही, असा दावा त्यांनी केला.
'प्रकाश आंबेडकर यांनी अनेक निवडणूक लढवल्या. परंतु, त्यांना यश मिळाले नाही. मी त्यांना म्हणालो होतो की, त्यांनी एनडीएमध्ये यावे, त्यांच्या जागा निवडणून येतील. एवढेच नव्हेतर, त्यांना मंत्रिपद मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेल. १९९० मध्ये प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत लढले असते तर, आमच्या १० ते १२ जागा निवडून आल्या असत्या आणि उपमुख्यमंत्रीपद आम्हाला मिळाले असते. पंरतु, तेव्हा त्यांनी तसे केले नाही. मात्र, आता प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक विचारा करणे आवश्यक आहे. ते एकटे लढून सत्तेत येऊ शकत नाही, त्यांनी आघाडी करणे आवश्यक आहे', असे रामदार आठवले म्हणाले.
महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. सध्याच्या विधानसभेत भाजप १०३ आमदारांसह सर्वात मोठा पक्ष आहे, त्याखालोखाल शिवसेना ४०, राष्ट्रवादी ४१, काँग्रेस ४०, शिवसेना (ठाकरे) १५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १३ आणि इतर २९ आमदार आहेत. काही जागा रिक्त आहेत.