अजित पवारांचे दिवंगत आर आर पाटलांवर गंभीर आरोप, आबांच्या स्टाईलने लेकाचे सडेतोड प्रत्युत्तर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अजित पवारांचे दिवंगत आर आर पाटलांवर गंभीर आरोप, आबांच्या स्टाईलने लेकाचे सडेतोड प्रत्युत्तर

अजित पवारांचे दिवंगत आर आर पाटलांवर गंभीर आरोप, आबांच्या स्टाईलने लेकाचे सडेतोड प्रत्युत्तर

Published Oct 29, 2024 07:17 PM IST

Ajit Pawar : आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला,असा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला. यावर रोहित पाटील यांनी ‘आबा स्टाईल’ने उत्तर दिले आहे.

रोहित पाटलांचे अजित पवारांचे चोख प्रत्युत्तर
रोहित पाटलांचे अजित पवारांचे चोख प्रत्युत्तर

जलसिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांनी दिवंगत आर आर पाटलांवर केलेल्या गंभीर आरोपांना आबांचे पुत्र रोहित पाटील यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर माझी खुली चौकशी करण्यात यावी, असा शेरा मारून त्या फाईलवर आर आर पाटील यांनी सही केली होती. आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला. यावर रोहित पाटील यांनी ‘आबा स्टाईल’ने उत्तर देत आबांच्या पारदर्शकपणे कामकाजाचा मला सार्थ अभिमान असल्याचे म्हटले आहे. 

आर आर पाटलांवरील टीकेला रोहित पाटील यांनी उत्तर देताना म्हटले की, अजित पवार ज्येष्ठ नेते असून त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही काम केले आहे. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आम्ही शरद पवार साहेबांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. आबा असते तर त्यांनीही असाच निर्णय घेतला असता, याची जाणीव सर्वांनाच आहे. आज आबा जाऊन नऊ वर्षाहून अधिकचा काळ गेला असताना इतक्या वर्षानंतर अजित पवारांना मनातील मळमळ बोलून दाखवली. याचे मला व माझ्या कुटूंबाला मोठं दु:ख झाले आहे. 

आर आर आबांनी गृहखात्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. सक्षमपणे महाराष्ट्राचे गृहमंत्रिपद सांभाळले. अनेक धडाडीचे निर्णय घेतले. राज्यात सगळ्यात मोठी पोलीस भरती केली. गोरगरिबांची पोरं पोलीस सेवेत आली. आबांनी अतिशय पारदर्शकपणे गृहखाते सांभाळले, हे अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. असे असताना त्यांच्या स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराला कुणाचा विरोध असेल तर आमचे काही म्हणणे नाही, असा टोलाही रोहित पाटील यांनी लगावला.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे तासगाव-कवठे महंकाळ विधानसभेचे उमेदवार संजय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजित पवार तासगावात आले होते. त्यानंतर झालेल्या सभेत अजित पवार यांनी दिवंगत नेते आर आर पाटील यांच्यावर टीका केली. 

काय म्हणाले होते अजित पवार –

तासगाव येथील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जलसिंचन विभागात ७०  हजार कोटींचा घोटाळा केल्याचे आरोप केले. घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली. त्यावेळी गृहमंत्री असणारे आर. आर. पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी,  असा शेरा फाईलवर मारला. त्यावर त्यांनी सहीही केली. आर आर पाटील यांना एवढे सहकार्य करूनही त्यांनी माझा केसाने गळा कापला. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनीच मला आर आर पाटील यांची सही दाखवली, असे म्हणत त्यांनी जलसिंचन घोटाळा चौकशीचे खापर आर आर आबांच्या माथी फोडण्याचा प्रयत्न केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या