अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाला. त्याला व्यासपीठावरच अश्रू अनावर झाले. लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ आज पार पडला. या कार्यक्रमात बोलताना रितेश देशमुख यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले व स्टेजवरच त्यांना रडू कोसळले. यावेळी रितेश यांनी राजकीय टोलेबाजीही केली. सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना काका पुतण्याचं नातं कसं असावं याचंही उदाहरण त्यांनी दिलं.
वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना रितेश देशमुख म्हणाला की, सध्याचं राजकारण फार वेगळं आहे,साहेबांच्या काळात राजकारण होतं, पण वैयक्तिक टीका नव्हती. वडिलांची उणीव नेहमीच भासते, पण वडिलांची उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका नेहमी आमच्या मागे उभे राहिले. काकांना बऱ्याच वेळेस बोलता आलं नाही. पण, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो,असं म्हणत रितेश देशमुखने काका दिलीपराव देशमुख यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं.
रितेश म्हणाला की, वडिलानंतर काकांनी साथ दिली. काका नेहमी उभे राहिले. काकांना बोलता आलं नाही. पण आज सर्वांसमोर सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका पुतण्याचं नातं कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण आज आहे,असे म्हणत रितेश देशमुख मंचावर भावुक झाले. यावेळी आई वैशालीताई देशमुख, अमित देशमुख, तसेच दिलीपराव देशमुख यांच्या देखील डोळ्यात पाणी आलं.
साहेबांना जाऊन जवळपास १२ वर्ष झाली. थोडी फार उणीव नेहमीच भासते,पण ही उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका नेहमी मागे उभे राहिले.
संबंधित बातम्या