Pune flood aftermath : पुण्यात काही भागात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे काही भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. त्यानंतर आता पुण्यात जलजन्य व कीटकजन्य आजार वाढण्याची शक्यता आहे. शहरात अधिक झिका आणि डेंगूचे रुग्ण वाढत आहे. त्यात आता साथीच्या आजारासह जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी व पाणी उकळून प्यावे असे आवाहन महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
पुण्यात गेल्या दोन आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने पुण्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. याचा सर्वाधिक फटका हा सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना बसला होता. या ठिकाणी अनेक घरे आणि सोसायट्यांमध्ये पाणी घुसले होते. पाण्यासह घाण, माती, गाळ या परिसरात साचला होता. तर पाण्याच्या टाक्यांमध्येही घाण साचली होती. तर नळाला येणारे पाणी देखील अशुद्ध, गढूळ होते. त्यामुळे या भागात प्रामुख्याने जलजन्य व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी व पाणी प्रामुख्याने उकळून प्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दूषित पाणी प्यायल्याने पसरणाऱ्या जलजन्य आजारांचा धोका वाढल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महानगर पालिकेने केले आहे. दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे अतिसार, जुलाब, कॉलरा, टायफॉईड ताप, हिपॅटायटीस यांसारख्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी किंवा मनपा आरोग्य केंद्रांना सतर्क करा, असे आवाहन मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी केले आहे.
पुण्यात झिकाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रविवारी आणखी ९ जणांना झिकाची बाधा झाल्याचे तपासणी अहवालात आढळून आले आहे. त्यामुळे आता बाधित रुग्णांची संख्या ही ४८ झाली आहे. तर डेंग्यूचे रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तर चिकुनगुनियाचे रुग्णही वाढत आहेत. पुरानंतर आता जलजन्य आजार पसरण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाच्या पथकाने पूरग्रस्त भागात पाहणी केली आहे व वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य पथकाने सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगर, विठ्ठलनगर कॉलनी, निंबजनगर, आनंदनगर, शिवाजीनगरमधील पाटील इस्टेट, पुलाची वाडी, कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयातील मंगळवार पेठ, भीमनगर परिसर या पूरग्रस्त भागात पाहणी करत खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.
शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया, हिवताप यांसारख्या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी पालिकेने उपाय योजना सुरू केल्या आहेत. ठीक ठिकाणी औषध फवारणी केली जात आहे. पिण्याचे पाणी निर्जंतुक करण्यासाठी मेडीक्लोर औषधाच्या बाटल्यांचे वाटप देखील केले जात आहे. दूषित पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक औषधोपचार केले जात आहेत, अशी माहिती पुणे महानगर पालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. निना बोराडे यांनी केले आहे.
संबंधित बातम्या