सध्या विजेचं अव्वाच्या सव्वा बिल परवडत नसल्याने अनेक नागरिक सौर ऊर्जेचा पर्याय निवडत आहेत. त्यात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीएम-सूर्य घर वीज योजनेमुळे अनेकांना प्रोत्साहन मिळत आहे. मुंबईत बोरिवलीमध्ये राहणारे विकास पंडित यांनी पीएम-सूर्य घर वीज योजनेंतर्गत जून २०२४मध्ये त्यांच्या घरावर ३ किलोवॅट क्षमतेची रुफटॉप सोलर सिस्टिम बसवली होती. यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे वीज बील येत नाही. ग्रीन एनर्जीचा पर्याय स्विकारल्याबद्दल आता पंडित यांचा केंद्र सरकारने सन्मान केला आहे. येत्या २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या रिपब्लिक डे परेडमध्ये विशेष पाहुणे म्हणून सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारकडून पंडित यांना आमंत्रित करण्यात आले आहे. पीएम-सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत घरावर रुफटॉप सोलर सिस्टिम बसवणाऱ्या देशभरातील निवडक ८०० नागरिकांचा सन्मान करण्यासाठी दिल्लीच्या रिपब्लिक डे परेडचे निमंत्रण देण्यात आले आहे.
याबाबत बोलताना पंडित म्हणाले, ‘टाटा पॉवरने माझ्या घरावर बसवलेली २.७ किलोवॅट क्षमतेची रुफटॉप सोलर सिस्टिम माझ्या कुटुंबासाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे. फक्त सहा महिन्यांमध्ये आम्ही वीज बिलात २४ हजार रुपयांची बचत केली आहे. दर दिवशी जवळपास २५ युनिट शुद्ध विजेची निर्मिती होत असते. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेची संपूर्ण प्रक्रिया अतिशय सोपी, पारदर्शक आणि ऑनलाईन होती. अनेकांनी आमचे इन्स्टॉलेशन पाहून माझ्याकडे मार्गदर्शन देखील मागितले आहे. शाश्वत भविष्याच्या दिशेने उचलण्यात आलेले हे एक पाऊल आहे, असे मला वाटते.’ असं पंडित म्हणाले.
टाटा पॉवर मुंबई डिस्ट्रिब्युशनने संपूर्ण मुंबईभर पीएम-सूर्य घर मोफत वीज योजना लागू केली आहे. ४० पेक्षा जास्त घरे आणि हाऊसिंग सोसायट्या या योजनेमध्ये आधीच सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे रुफटॉप सोलर क्षमता जवळपास २४ मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. कंपनीने या इन्स्टॉलेशनबरोबरीनेच ग्राहकांना थेट आर्थिक लाभ देखील सुनिश्चित केले आहेत. या अंतर्गत आतापर्यंत ८५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
पीएम-सूर्य घर मोफत वीज योजना मुंबईकरांसाठी गेम-चेंजर योजना ठरत आहे. योजनेद्वारे केवळ सौर ऊर्जेचा वापर करण्याचीच नव्हे तर वीज बिलांमध्ये लक्षणीय बचत करण्याची संधी मुंबईकरांना मिळते आहे.
संबंधित बातम्या