मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Metro: कारशेडच्या भुर्दंडाचे १० हजार कोटी ठाकरेंकडून वसूल करा: भाजप

Mumbai Metro: कारशेडच्या भुर्दंडाचे १० हजार कोटी ठाकरेंकडून वसूल करा: भाजप

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Nov 30, 2022 07:20 PM IST

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हट्टामुळेच मुंबईत मेट्रो कारशेडचे काम रखडल्यामुळे मुंबईकरांवर दहा हजार कोटींचा वाढीव बोजा पडल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Former Maharashtra chief minister Uddhav Thackeray
Former Maharashtra chief minister Uddhav Thackeray (HT_PRINT)

मुंबई मेट्रो कारशेडसाठी आरे जंगलातील आणखी ८४ झाडे कापण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नुकताच हिरवा कंदील दाखवला होता. कारशेडसाठी कांजूरमार्गऐवजी ‘आरे’ची राज्य सरकारने केलेली निवड योग्य असल्याचे सांगत न्यायालयाने निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. या निर्णयानंतर भाजपने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हट्टामुळेच मुंबईत मेट्रो कारशेडचे काम रखडल्यामुळे मुंबईकरांवर दहा हजार कोटींचा वाढीव बोजा पडला. हा मुंबईद्रोह असून राज्याबद्दल उद्योगक्षेत्रात संशयाचे वातावरण तयार करून आता महाराष्ट्र द्रोह केला जात आहे, असा आरोप प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी केला. मुंबई मेट्रोचे काम रखडवल्याबद्दल उद्धव व आदित्य या ठाकरे पितापुत्रांकडून दहा हजार कोटी वसूल करा, अशी मागणीही उपाध्ये यांनी यावेळी केली.

कारशेड आरेमध्येच उभारणे योग्य असल्याचा अहवाल जाणीवपूर्वक दाबून ठेवून कारशेडच्या कामास स्थगिती देताना, मुंबईकरांना सुविधांपासून वंचित ठेवण्याचाच ठाकरे पितापुत्रांचा कट होता का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. मेट्रो कारशेड आरेमध्येच उभारावी, असा अहवाल मनोज सौनिक समितीने २०२० मध्ये ठाकरे सरकारला दिला होता. आता सर्वोच्च न्यायालयानेही आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास हिरवा कंदिल दाखविल्याने ठाकरे यांच्या हट्टाचे पितळ उघडे पडले असल्याचं उपाध्ये म्हणाले.

वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पाविषयीची वस्तुस्थिती स्पष्ट

वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पाविषयीची वस्तुस्थिती याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. घरातून सत्ता राबविण्याच्या उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळेच महाराष्ट्रातून अनेक प्रकल्पांनी काढता पाय घेतला, असा आरोप उपाध्ये यांनी केला. ही जबाबदारी ढकलून महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा आदित्य ठाकरे यांचा प्रयत्न केविलवाणा आहे, असा टोला उपाध्ये यांनी लगावला. आदित्य ठाकरे यांनी दाखवलेली कागदपत्रे फॉक्सकॉन महाराष्ट्रातून जाऊ नये यासाठी शिंदे - फडणवीस सरकारने केलेल्या प्रयत्नांची साक्ष देणारी आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा यासाठी उद्धव ठाकरे सरकारने केलेल्या प्रयत्नांचा पुरावा म्हणून आदित्य ठाकरे यांनी एक कागद तरी दाखवावा, असे आव्हानही उपाध्ये यांनी दिले.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या