भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर होताच राज्यभरात कुठे कुठे झाली बंडखोरी? वाचा बंडखोरांची संपूर्ण यादी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर होताच राज्यभरात कुठे कुठे झाली बंडखोरी? वाचा बंडखोरांची संपूर्ण यादी

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर होताच राज्यभरात कुठे कुठे झाली बंडखोरी? वाचा बंडखोरांची संपूर्ण यादी

Oct 21, 2024 09:36 PM IST

राज्यात भाजपची पहिली यादी जाहीर होताच तिकीट न मिळालेल्या इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकावल्याचे दिसून येत आहे.

भाजपची पहिली यादी जाहीर होताच अनेक ठिकाणी बंडखोरी
भाजपची पहिली यादी जाहीर होताच अनेक ठिकाणी बंडखोरी

भारतीय जनता पार्टीने सर्वात आधी उमेदवारांची जाहीर करून राज्यात राजकीय पक्षांमध्ये बाजी मारली. मात्र उमेदवारांच्या यादीनंतर पक्षात प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकावल्याचे दिसून येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात बंड माजू नये यासाठी नाराजी दूर करण्यासाठी मुंबई, दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आज सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर भाजपतील अनेक नाराजांनी हजेरी लावून आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

भाजपने काल, रविवारी महाराष्ट्रातील ९९ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची पहिली यादी जारी केली. या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांचा समावेश आहे. या यादीत काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे.

भाजपत कुठे कुठे फडकले बंडाचे निशाण?

 

अहमदनगर जिल्ह्यात तीन ठिकाणी बंडखोरी

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजी कर्डिले यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपची मुहूर्तमेढ रोवणारे माजी आमदार चंद्रशेखर कदम नाराज झाले आहेत. २०१९ मध्ये शिवाजी कर्डिले हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राजक्त तनपुरेंकडून पराभूत झाले होते. चंद्रशेखर कदम यांनी त्यांचा मुलगा सत्यजित कदम याच्यासाठी तिकीटाची मागणी केली होती. सत्यजित हे देवळाली-प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आहेत. दरम्यान, माझे कार्यकर्ते जी भूमिका घेतील त्यानुसार भविष्याची दिशा ठरवली जाईल असं चंद्रशेखर कदम यांनी माध्यमांना सांगितले. राहुरी विधानसभा मतदारसंघात कदम कुटुंबाने बंडखोरीचे संकेत दिले असून निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी वेगळा निर्णय घेतला तर भाजप आणि महायुतीसाठी तो मोठा धक्का ठरणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. राजळे या गेली १० वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. परंतु त्यांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे भाजपमधूनच विरोध होत आहे. अहमदनगर जिल्ह्याचे भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष गोकुळ दौंड यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे.  

अहमगनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. बबनराव पाचपुते यांनी प्रकृतीच्या कारणावरून विधानसभा निवडणूक लढण्यास नकार दिला होता. परंतु प्रतिभा पाचपुते यांना तिकीट जाहीर होताच भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस सुवर्णा पाचपुते यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. पक्षाबाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली जात असून आपण अपक्ष निवडणूक लढू असं सुवर्णा पाचपुते यांनी जाहीर केलं आहे.  

पुण्यात पर्वतीमध्ये बंडखोरीची शक्यता

पुणे शहरातील पर्वती मतदारसंघातून विद्यमान भाजप आमदार माधुरी मिसाळ यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपचे माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. भिमाले हे पर्वती मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांना तिकीट देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र पहिल्या यादीत मिसाळ यांना उमेदवारी दिल्याने आपण १०० टक्के नाराज झाल्याचं भिमाले म्हणाले. माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात आपली भूमिका जाहीर करू असं भिमाले यांनी म्हटलं आहे.

फुलंब्रीत शिंदे गट नाराज

संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. २०१९ साली या मतदारसंघातून हरिभाऊ बागडे निवडून गेले होते. परंतु त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्यानंतर अनेक इच्छुकांनी दावा ठोकला होता. अनुराधा चव्हाण यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. फुलंब्रीमध्ये शिवसेना (शिंदे गटाचे) रमेश पवार यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

सांगलीत गाडगीळांविरुद्ध बंडखोरी?

सांगली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्याने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे नाराज झाले आहेत. त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. 

चांदवडमध्ये दोघा भावातच जुंपली

चांदवडमध्ये विद्यामान आमदार डॉ. राहुल आहेर यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. या ठिकाणी उमेदवारी मिळावी म्हणून त्यांचे बंधू, नाफेडचे संचालक केदा आहेर इच्छुक होते. त्यामुळे केदा आहेर नाराज असल्याचे कळते. विशेष म्हणजे  डॉ. राहुल आहेर यांनी या मतदारसंघातून यंदा निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला होता. तरीसुद्धा पक्षाकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

 

 

 

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर