Poonam Mahajan on Pramod Mahajan Murder : प्रमोद महाजन यांच्या हत्येबाबत महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाजन यांची हत्या १८ वर्षांपूर्वी त्यांचे धाकटे बंधु प्रवीण महाजन यांनी केली होती. त्यांची हत्या का झाली? त्यामागे काय कारण होतं? याबाबत पूनम महाजन यांनी मोठा दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना पुनम महाजन यांनी म्हटलं की प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे मोठ षडयंत्र आहे. त्यांची हत्या का झाली याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलं आहे.
भाजपचे एकेकाळचे बडे नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे मोठा कट असल्याचा आरोप भाजप नेत्या आणि माजी खासदार पूनम महाजन यांनी केला आहे. प्रमोद महाजन हे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे प्रमुख रणनीतीकार होते. प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत पूनम महाजन म्हणाल्या, प्रमोद महाजन यांची हत्या हा एक मोठा कट होता, जो क्षुल्लक कारणे देऊन लपविण्यात आला. हे खरे नाही. सत्य लवकरच बाहेर येईल.
प्रमोद महाजन यांची हत्या झाल्यानंतर अनेक चर्चा झाल्या. प्रमोद महाजनांवर ज्यांनी गोळ्या झाडल्या ते त्यांचे बंधु जारी असले तरी ज्या बंदुकीने प्रमोद महाजन यांची हत्या झाली ती गोळी व बंदूक ही त्यांच्याच पैशांची होती. कदाचित त्या माणसाच्या अंगावरचे कपडे (प्रवीण महाजन) हे पण प्रमोदजींच्या पैशांचेच असू शकतात. पण बाबांना मारण्याचं डोकं फक्त एका माणसाचं असू शकत नाही. या मागे मोठे मास्टर माइंड असून याच शोध घ्यायला हवा.
पूनम महाजन म्हणाल्या की, या घटनेच्या सखोल चौकशीसाठी मी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार आहे. या हत्येमागे मोठा कट होता. एक दिवस सत्य बाहेर येईलच. हत्येनंतर भावांमधील भांडणे या प्रकारचे अनेक सिद्धांत मांडण्यात आले, जे खरे नव्हते. पैसा, मत्सर किंवा कौटुंबिक कलहामुळे हे घडले नाही. हे सर्व सत्य लपवण्यासाठी पसरवलेले काही किरकोळ मुद्दे होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पूनम महाजन यांनी हा खुलासा केला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांना मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीतही त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. "जेव्हा तुम्ही कुटुंबात असता तेव्हा तुम्ही कितीही जवळचे किंवा दूर आहात हे महत्त्वाचे नसते. या गोष्टी तुमच्या मनात येत नाहीत. अनेकदा अशा घटना घडतात, ज्यामुळे तक्रारी येतात, असे महाजन म्हणाल्या.
प्रमोद महाजन यांच्या हत्येच्या षड्यंयत्राच्या सिद्धांतामुळे भाजपमधील आणि भाजपबाहेरील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पूनम महाजन यांच्याकडे या कटाशी संबंधित काही पुरावे आणि कागदपत्रे असतील तर ती चौकशीसाठी सरकारकडे सोपवावीत, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले, प्रमोद महाजन आमचे नेते होते. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली होती. पूनमने जे म्हटले आहे ते धक्कादायक आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. त्याला गोळी लागली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. त्यावेळी कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात होते. त्यानंतरही चौकशी झाली आणि काहीच निष्पन्न झाले नाही.
प्रमोद महाजन यांची २२ एप्रिल २००६ रोजी वरळी येथील राहत्या घरी त्यांचे धाकटे बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. भाजप नेत्याचे ३ मे रोजी निधन झाले. त्यानंतर प्रवीणला अटक करण्यात आली आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. २०१० मध्ये पॅरोलवर बाहेर येत असताना प्रवीणचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.