मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sena vs Sena : शिवसेना कोणाची?; उद्धव ठाकरे यांची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव

Sena vs Sena : शिवसेना कोणाची?; उद्धव ठाकरे यांची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 15, 2024 05:04 PM IST

Uddhav Thackeray Vs Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या संदर्भात निकालाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray (Hindustan Times)

Uddhav Thacekray Faction Moves SC : एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधातील अपात्रतेची याचिका फेटाळतानाच शिवसेना पक्षही त्यांना बहाल करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे यांच्या गटानं एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. त्यास शिंदे गटानं न्यायालयात आव्हान दिलं होतं. या वादावर निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेची मागणी फेटाळतानाच शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर शिंदे गटाचाच हक्क असल्याचा निकाल दिला.

ठाकरे गटानं हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगत त्यास आव्हान देण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती द्यावी आणि शिंदे गटाच्या आमदारांना विधानसभा अधिवेशनात उपस्थित राहण्यापासून रोखावं, अशी मागणी ठाकरे गटानं आपल्या याचिकेत केली आहे.

Ajit Pawar Viral Video : तीळगूळ घ्या, गोड बोला पण मोदींना हटवा; अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल

राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल पक्षपाती असून लोकशाहीची हत्या करणारा आहे. नार्वेकर हे शिंदे गटाला मिळालेले आहेत. हा निकाल दिल्लीत ठरला असून नार्वेकर यांनी तो केवळ वाचून दाखवला. नार्वेकर हे शिंदे गटाचे वकील असल्यासारखेच वागत होते, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

काय आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप?

आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय राहुल नार्वेकर यांच्याकडं सोपवताना सर्वोच्च न्यायालयानं एक चौकट आखून दिली होती. त्यात चौकटीतच नार्वेकर यांना निर्णय द्यायचा होता. मात्र, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे सरळसरळ उल्लंघन केलं आहे. अपात्रतेच्या निर्णयाबरोबरच त्यांनी शिवसेनेविषयी निकाल दिला आहे. पक्षाविषयी निर्णय देणं हे त्यांच्या कार्यकक्षेतच येत नाही, असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

Milind Deora: शिंदे गटात प्रवेश करताच मिलिंद देवरांचे कार्यकर्त्यांना पत्र, म्हणाले...

आमदार अपात्रता व शिवसेनेबाबत निर्णय देताना नार्वेकर यांनी १९९९ ची पक्षाची घटना आधार मानली आहे. २०१३ व २०१८ सालची घटना अमान्य केली आहे. मात्र, पक्षाची घटनाच अमान्य असेल तर मग पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार पात्र कसे ठरतात? आमच्या आमदारांना अपात्र का ठरवण्यात आलं नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आगामी निवडणुकांच्या आधी सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणावर अंतिम निर्णय द्यावा, अशी अपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

WhatsApp channel