Budget 2023 : अजितदादांना जे जमलं, ते निर्मला सीतारामन यांना जमलं नाही; NCP आमदार बजेटवर बोलला!
Rohit pawar on union budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खोचक टीका केली आहे.
Reactions on union budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकारची मागच्या काही वर्षांतील कामगिरी अधोरेखित करताना सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं सरकारचे नव्या वर्षातील प्राधान्यक्रमही स्पष्ट केले. त्यांनी सादर केलेल्या बजेटवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया बोलकी आहे.
ट्रेंडिंग न्यूज
सरकारचे सात प्राधान्यक्रम सांगताना निर्मला सीतारामन यांनी 'सप्तर्षी' असा उल्लेख आपल्या भाषणात केला. तोच धागा पकडून रोहित पवार यांनी सीतारामन यांच्या बजेटचं विश्लेषण केलं आहे. ‘महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मागील अर्थसंकल्पात पंचसूत्रीचा वापर करत अर्थसंकल्पाची फ्रेम कशी असावी याचं उत्तम उदाहरण तत्कालीन अर्थमंत्री अजितदादांनी घालून दिलं होतं. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी तोच संदर्भ ‘सप्तर्षी’ सांगताना वापरला असावा. मात्र, अजितदादांनी ज्या ठोस तरतुदी केल्या, तशा सप्तर्षीमध्ये दिसत नाहीत, असं रोहित पवार म्हणाले.
'भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला युवा वर्ग, बळीराजा, कामगार, असंघटित क्षेत्र यंदाच्या अर्थसंकल्पात दिसत नाही. पुढच्या वर्षी निवडणुका असूनही यंदाच्या अर्थसंकल्पात गतवर्षीप्रमाणे लोकप्रिय घोषणा झाल्या नाहीत, याचाच अर्थ सरकारला देशाच्या आर्थिक वास्तवाची जाण झालेली दिसते, याकडं रोहित पवार यांनी लक्ष वेधलं.
'केवळ करपात्र उत्पन्नात सवलत व भांडवली खर्चात वाढ याच जमेच्या बाजू दिसतात. परंतु मागील सात वर्षांप्रमाणे केवळ तरतूद करून चालणार नाही, प्रत्यक्ष भांडवली खर्चही करायला हवा, तरच अर्थव्यवस्थेला गती मिळेल. करसवलतीचा लाभ घेण्यासाठी लोकांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करण्याची गरज होती, असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.