RCH News : राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या मुख्य योजनांपैकी एक म्हणजे बालमृत्यू दर, माता मृत्यू दर कमी करणे व देशभरातील गर्भवती महिला आणि बालकांना दर्जेदार सेवा सुनिश्चित करणे आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने माता व बाल आरोग्य संबंधित सेवांची माहिती मिळविण्यासाठी प्रजनन व बाल आरोग्य (आरसीएच) पोर्टल सुरू केले असून यावर गर्भवती मातांची नोंद केली जाते. ही आरसीएच नोंद केल्यानंतर त्यांना 'आरसीएच' नंबर मिळतो. या नोंदणीनंतरच महिलांना राज्य सरकार व केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळतो. त्यामुळे ही नोंद केली नसेल तर त्वरित करावी. अन्यथा शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.
महानगरपालिका अंतर्गातील कोणत्याही शासकीय रुग्णालयातील सहायक परिचारिका (एएनएम) यांच्याकडून गर्भवती महिलांची नोंदणी रेप्रोडोक्टिव्ह अॅण्ड चाइल्ड हेल्थ' (आरसीएच) या पोर्टलवर केली जाते. यात संबंधित गर्भवतीचे नाव, वय, पत्त्यासह तिला असलेल्या आजारांचीही नोंद व उपचारांची माहिती घेतली जाते. त्यानंतर त्या गर्भवतीला 'आरसीएच' नंबर मिळतो. गर्भवती महिला कोणत्याही शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास या नंबरवरील एका क्लिकवर त्यांची सर्व माहिती मिळते.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सर्व रुग्णालयांमध्ये गर्भवतीची नोंद घेतली जाते. सोबतच 'आरसीएच' नंबर दिला जातो. १५ ते ४९ वर्षे वयोगटातील महिलांनी होणाऱ्या अपत्यांची नोंद आपसूकच महानगरपालिका किवा नगरपालिका, ग्रामपंचायतींकडे करणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी : 'आरसीएच' नोंदणीकृत महिलेस शासनस्तरावरून राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीचा लाभ दिला जातो.
महात्मा फुले जन आरोग्य योजना: नोंदणी झालेल्या महिलेच्या उपचाराकरिता महात्मा फुले जन आरोग्य योजनेची सुविधा उपलब्ध आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजना: प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचादेखील संबंधित नोंदणीकृत महिलेस लाभ घेता येतो, त्यामुळे आरसीएच नोंद न केल्यास या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.