Mumbai RBI News : मुंबईतील रिझर्व्ह बँकेचं कार्यालय बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी आल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
रशियन भाषेत लिहिलेला धमकीचा ईमेल आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर आला आहे. त्यात बँकेत स्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रकरणी माता रमाबाई मार्ग (MRA Road) पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या झोन एकच्या उपायुक्तांनी दिली.
दुसरीकडं दिल्लीतील सहापेक्षा जास्त नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. पश्चिम विहारमधील भटनागर पब्लिक स्कूल, श्रीनिवासपुरीयेथील केंब्रिज स्कूल, ईस्ट ऑफ कैलासमधील दिल्ली पब्लिक स्कूल, डिफेन्स कॉलनीतील दिल्ली पब्लिक स्कूल, सफदरजंग एन्क्लेव्हमधील दिल्ली पोलिस पब्लिक स्कूल आणि रोहिणी येथील व्यंकटेश पब्लिक स्कूल या शाळांना लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दिल्ली अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीनं प्रतिसाद देत विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कसून शोध घेतला. सविस्तर तपासणी केल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
दिल्लीतील ४० हून अधिक शाळांना ८ डिसेंबर रोजी ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देऊन ३० हजार डॉलरची खंडणी मागितली होती.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी केंद्र सरकारवर टीका करताना भाजप प्रणित प्रशासन सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. 'दिल्लीच्या जनतेनं कायदा आणि सुव्यवस्थेची इतकी बिघडलेली परिस्थिती कधीच अनुभवली नव्हती, असं त्यांनी म्हटलं आहे.
१९ नोव्हेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलिसांना बॉम्बच्या धमक्या आणि तत्सम आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सविस्तर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) सह एक व्यापक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. या उपाययोजना पूर्ण करण्यासाठी न्यायालयानं आठ आठवड्यांची मुदत दिली आहे.