Ravindra Waikar Jogeshwari Plot Scam : मुंबईतील गाजलेल्या जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यात आला असून या प्रकरणाची फाइल देखील बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गैरसमजातून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुंबई महानगर पालिकेने म्हटले आहे.
मुंबईतील प्रसिद्ध जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबच्चा गैरवापर करून तिथे हॉटेल्स बांधताना माहिती लपवल्याचा व बनावट माहितीच्या आधारे महापालिकेकडून विविध परवानग्या घेण्यात आल्याप्रकरणी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) गटाचे खासदार खासदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण बंद करण्याबाबत मुंबई पोलिसांनी दाखल केलेला अहवाल महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मान्य केला असून या प्रकरणी वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या मागचा चौकशीचा ससेमिरा थांबला आहे.
जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळ्या प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात मांडला होता. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला अहवाल महानगर दंडादाधिकारी न्यायालयाने मान्य केला आहे. मुंबई महापालिकेने वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे यात नमूद केले आहे.
महापालिकेचे उपअभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून सप्टेंबर महिन्यात आझाद मैदानं पोलीस ठाण्यात रविंद्र वायकर यांच्यासह त्यांची पत्नी मनीषा वायकर, त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि वास्तुविशारद अरुण दुबे यांच्या विरोधात गुन्ह गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत होतं. या प्रकरणी ईडीने देखील गुन्हा केला होता.
जोगेश्वरी येथील भूखंड खरेदी व्यवहारात घोटाला झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. जोगेश्वरी येथील मुंबई पालिकेच्या जागेवर रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधले असून या बाबत कोणतीही परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. तब्बल ५०० कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला होता. तर ईडीने देखील या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.