Sanjay Raut Post on X : 'उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांना पक्षांतर करण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत,' असा गंभीर आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी रवींद्र वायकर यांचा उद्धव ठाकरे यांच्या सोबतचा फोटो शेअर करून एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी वायकर यांच्यावर प्रचंड दबाव असल्याचं म्हटलं आहे.
‘शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वगैरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव टाकला जात आहे. येत्या काही दिवसात शिवसेना सोडा… पक्षांतर करा… नाहीतर तुरुंगात जा असं त्यांना धमकावले जात आहे. हा एक प्रकारे दहशतवाद आहे. असं राजकारण या आधी कधीच घडलं नव्हतं,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
‘रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत. ते लढतील व जिंकतील. आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत,’ असंही पुढं राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेल्या आमदारांमध्ये मुंबईतील रवींद्र वायकर, सुनील प्रभू, अजय चौधरी, सुनील राऊत या आमदारांचा समावेश आहे. यातील रवींद्र वायकर यांच्यावर महापालिकेच्या भूखंड घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. वायकर यांनी हे आरोप फेटाळले आहेत. महापालिकेच्या नियमांनुसार जोगेश्वरी येथील भूखंडाचा वापर केला गेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर, वायकर यांनी भाजपमध्ये किंवा एकनाथ शिंदे गटात प्रवेश करावा यासाठी त्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी हार मानलेली नाही. सोबत असलेल्या मोजक्या आमदार व खासदारांना घेऊन ते आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. निवडणूक आयोगानं काहीही निर्णय दिला तरी शिवसेना ही एकच आहे आणि ती कुणी संपवू शकत नाही असं उद्धव ठाकरे हे सांगत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांना नामोहरम करण्याचे प्रयत्न सत्ताधारी युतीकडून सुरू आहेत. संजय राऊत यांनी ताज्या ट्वीटमधून हेच अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.