रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात तीन जण बुडाले होते, यातील दोन जणांचा मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये जेएसडब्ल्यू कंपनीच्या पोर्टवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आज सुट्टी असलेल्याने कंपनीचे तीन कर्मचारी समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला तर एकाला वाचविण्यात यश आले. ही घटना रविवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रदीप कुमार (३०, मूळ रा. ओडिशा) आणि महंमद युसूफ (२९, मूळ रा. उत्तराखंड) अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर डाकुआ टुकुना (३०, रा. पश्चिम बंगाल) याला वाचविण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी कंपनीला सुट्टी असल्याने जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्ट मरीन कंपनीचे कर्मचारी दुपारी फिरण्यासाठी गणपतीपुळे येथे आले होते. सायंकाळच्या सुमारास प्रदीप कुमार, महंमद युसूफ आणि डाकुआ टुकुना हे तिघे समुद्रात अंघोळीसाठी उतरले होते.
तिघांनीही समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघे बुडू लागले. गणपतीपुळेचा समुद्र पोहण्यासाठी धोकादायक समजला जातो. चाळ पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न घेता तिघेजण खोल पाण्यात गेले. आपण समुद्रात बुडत असल्याचे लक्षात येताच तिघांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून जीवरक्षक व पोलीस त्यांच्या मदतीसाठी धावले.
तिघांना समुद्रातून बाहेर काढून त्यांना गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने उपचारासाठी तत्काळ मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी करून प्रदीप कुमार व महंमद युसूफ यांना मृत घोषित केले. डाकुआ टुकुना यांच्यावर उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे.