Ratnagiri Sakharpa Leopard News: रत्नागिरीतील साखरपा परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. बिबट्याच्या भितीपोटी नागरिकांनी आपल्या घरी आणि कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. नुकतीच एक घटना समोर आली आहे, ज्यात बिबट्याने एका हॉटेलमध्ये शिरून कुत्र्यावर हल्ला करत त्याला फरफटत नेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ रत्नागिरीतील साखरपा येथील सह्याद्री हॉटेलमधील आहे, ज्यात बिबट्या पहाटेच्या सुमारास हॉटेलमध्ये शिरून कुत्र्यावर हल्ला करतो. संपूर्ण घटना हॉटेलच्या कॅमेरा ४ मध्ये कैद झाली. सीसीटीव्ही फुटेजवरून असे समजते की, ही घटना रविवारी (७ जुलै २०२४) पहाटे ०३ वाजून ११ मिनिटांची आहे. मात्र, या घटनेने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. तसेच या बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. याआधीही या भागात बिबट्या सदृश्य प्राणी दिसून आलेले आहेत.
याआधी पुण्यातील सासवड रोडवर दिवे घाटात बिबट्याचे दर्शन घडले. त्यानंतर वाहनचालकांनी बिबट्याचा व्हिडिओ काढला, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. ही घटना ताजी असताना भिलारेवाडी येथील आर्यन स्कूल जवळ रविवारी बसल्याचे निदर्शनास आले. एका ग्रामस्थाने आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचा व्हिडिओ आणि फोटो काढला. बिबट्याचे मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य वाढू लागल्याने दिवसा घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.
छत्रपती संभाजीनगरातील कन्नड तालुक्यातील भाबंरवाडी येते बिबट्याच्या हल्ल्यात १५ वर्षाचा मुलगा ठार झाला. गेल्या महिन्यात २६ जून रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. ऋषिकेश विलास राठोड (वय,१५) असे या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लघुशंकेसाठी गेलेल्या ऋषिकेश लवकर घरी न परतल्याने घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. त्यानंतर सकाळी नातेवाईकांना जवळच्या आश्रमाजवळ त्याचा मृतदेह सापडला. नातेवाईकांनी त्याला त्वरीत जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले.मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बिबट्याच्या हल्ल्यात गावातील मुलाचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पुन्हा त्या बिबट्याने कोणावर हल्ला करू नये, यासाठी बिबट्याला जेरबंद करून अभयारण्यात सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
संबंधित बातम्या