Samvidhan Rakshak Rally : राज्यातील पुरोगामी व विवेकवादी कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी व लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी उद्या (बुधवार) २३ ऑक्टोबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी मंदिर सभागृहात पुरोगामी व विवेकवादी विचारवंतांची जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता ही सभा होणार आहे.
काही दिवसांपूर्वी पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात टीव्हीवर येणाऱ्या एका कार्यक्रमातील पात्राच्या वेशभूषेबद्दल विधान केलं होतं. तसंच, एक मुद्दा मांडताना रामायणाचा दाखला दिला होता. त्यानंतर काही धर्मवाद्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना माफी मागायला लावली होती व पुन्हा असं न करण्याचा इशारा दिला होता. श्याम मानव यांनाही अधूनमधून अशाच प्रकारच्या धमक्या येत आहेत.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या या गळचेपीचा निषेध करण्यासाठी मुंबईत लोकशाहीवाद्यांची सभा घेण्यात येत आहे. चला, बुलंद करूया… आवाज लोकशाहीचा… ही सभेची संकल्पना आहे. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. राहुल भंडारे व अमोल जाधवराव हे संयोजक आहेत.
या सभेला महात्मा गांधी यांचे पणतू, सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, नाटककार प्रेमानंद गज्वी, श्यामदादा गायकवाड, निरंजन टकले, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, लोकशाहीर संभाजी भगत हे उपस्थित राहणार आहेत. समस्त लोकशाहीवाद्यांनी समविचारी कार्यकर्त्यांसह या सभेला उपस्थित राहावं, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
संबंधित बातम्या