Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, उद्याच पदभार स्वीकारणार!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, उद्याच पदभार स्वीकारणार!

Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, उद्याच पदभार स्वीकारणार!

Nov 26, 2024 12:10 AM IST

Rashmi Shukla Reappointed As Maharashtra DGP: महायुतीच्या विजयानंतर रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Rashmi Shukla News: रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सकाळी रश्मी शुक्ला आपला पदभार स्वीकारणार आहेत.विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदमुक्त करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा त्यांना सेवेत दाखल करून घेण्यात आले.

रश्मी शुक्ला यांच्यावर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप होता. काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्लांना निवडणुकीच्या काळात पदावरून हटवले आणि त्यांच्याऐवजी संजय कुमार वर्मा यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. पंरतु, ही नियुक्ती तात्पुरती होती. निवडणूक आयोगाच्या आग्रहाखातर महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी तीन आयपीएस अधिकाऱ्यांची नावे सुचवली होती, ज्यात मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, डीजी संजय वर्मा आणि होमगार्डप्रमुख रितेश कुमार यांसारख्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश होता.

रश्मी शुक्ला कोण आहेत?

रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.रश्मी शुक्ला यांनी भूगर्भशास्त्र या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. दरम्यान, रश्मी शुक्ला यांना २००५ मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. २००८ मध्ये त्यांची महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलिसांमध्ये औरंगाबाद ग्रामीण, नाशिक ग्रामीण, सातारा आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक दक्षिण विभाग अशा विविध पदांवर काम केले. IPS रश्मी शुक्ला यांनी दिल्ली आणि हैदराबादमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचे उपमहानिरीक्षक आणि हैदराबादमध्ये सीआरपीएफचे अतिरिक्त महासंचालक म्हणूनही काम केले. त्यांचे लग्न आयपीएस अधिकारी उदय शंकर यांच्याशी झाले, ज्यांचे निधन २०१८ मध्ये झाले.

विधानसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, आचारसंहिता लागू असताना शुक्ला यांनी राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मतमोजणीच्या दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबररोजी संध्याकाळी शुक्ला यांनी फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

 

 

 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर