Rashmi Shukla new maharashtra DGP : फोन टॅपिंगचे आरोप झालेल्या व नंतर क्लीन चिट मिळालेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर होत्या. राज्य सरकारचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठी दणका मानला जात आहे.
राज्य सरकारनं आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची व नव्या नियुक्त्यांची घोषणा केली. सध्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे डिसेंबरमध्ये निवृत्त होणार होते. त्यांनी आधीच स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानं त्यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या अधिकारी आहेत.
एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर बुधवारी सेवानिवृत्त झाल्यानं हे पद रिक्त झालं होतं. त्यांच्या जागी माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रजनीश सेठ यांनी स्वत: या पदासाठी अर्ज केला होता. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं अर्जांची छाननी करून तीन नावांची अंतिम यादी मुख्यमंत्र्यांकडं विचारार्थ पाठवली होती. त्यात रजनीश सेठ यांच्यासह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि वन सेवेतील निवृत्त वरिष्ठ अधिकारी प्रदीपकुमार यांचा समावेश होता. सेठ यांचीच या पदावर वर्णी लागेल असं बोललं जात होतं. ते खरं ठरलं आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना रश्मी शुक्ला या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख होत्या. या पदाचा गैरवापर करत त्यांनी तेव्हाच्या विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणी त्यांच्यावर मुंबईत कुलाबा आणि पुण्यात असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही कारवाई करण्यात आली होती. राज्यात सत्ताबदल होताच पुण्यातील गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांनी सी समरी रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता. तर, मुंबईच्या प्रकरणात त्यांच्या विरोधात खटला चालवण्यास सरकारनं नकार दिला होता. त्यामुळं मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्या विरोधातील दोन्ही एफआयआर रद्द केले होते.