Raosaheb Danve Viral Video : माजी मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे हे त्यांच्या वक्तव्यामुळे तर कधी त्यांच्या वेगळ्या स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतात. सध्या त्यांच्या नव्या स्टाईलचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे दानवे यांच्यावर चौफेर टीका होता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असलेले अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. या भेटीवेळी दोघांनी फोटो काढला. मात्र, याच वेळी दानवे यांच्या बाजूला एक कार्यकर्ता आल्याने दानवे यांनी त्याला बाजूला करण्यासाठी त्यांच्या हटके स्टाईलने लाथ मारून त्याला बाजूला केले. ही संपूर्ण घटना मोबाइलवर व्हिडिओत कैद झाली असून हा व्हिडिओ आता व्हायरल झाल्याने दानवे टीकेचे धनी ठरले आहेत.
राज्यात सध्या निवडणूक प्रचार रंगात आला आहे. उमेदवार प्रचारात गुंतले असून नेत्यांच्या भेटी गाठी घेत आहेत. महायुतीचे उमेदवार देखील मित्र पक्षातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत. याची भेटी दरम्यान, दानवे यांनी केलेल्या या कृत्यामुळे सर्व सामान्य नागरिक व कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. या व्हायरल व्हिडिओवरून विरोधकांनी दानवे यांना घेरले असून त्यांच्यावर टीका केली आहे.
जालना येथे अर्जुन खोतकर यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी रावसाहेब दानवे यांची खोतकर यांनी भेट घेतली. या कार्यक्रमात खोतकर हे रावसाहेब दानवे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत होते. दरम्यान, दोघेही फोटो काढण्यासाठी उभे राहिले होते. याच वेळी दानवे यांचा एक कार्यकर्ता फोटोमध्ये येत होता. ही बाब दानवे यांच्या लक्षात आली. त्यांनी तो कार्यकर्ता फोटोत येत असल्याने त्याला थेट लाथ मारली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली. यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
रावसाहेब दानवे हे त्याच्या वादग्रस्त विधानाने नेहमी चर्चेत राहत असतात. यामुले त्यांच्यावर टीकाही होते. मात्र, त्यांनी फोटोत येऊ नये यासाठी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला लाथ मारल्याने त्यांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांत नाराजी आहे. त्यांनी या घटनेबद्दल चीड व्यक्त केली आहे. त्यांनी थेट दानवे यांची तक्रार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना केली असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
तर विरोधकांनी देखील या घटनेवरून दानवे यांना घेरले आहे. भाजप नेत्यांच्या कृतीतूनच पक्षाच्या मानसिकतेचे दर्शन घडते. कार्यकर्त्यांना निस्वार्थीपणे काम करण्याचा सल्ला देणारे नेतेच जर त्यांना लाथा मारत असतील तर कार्यकर्ते नाराज होते साहजिक आहे असे एकाने म्हटले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करत दानवे यांना झापले आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांसोबत असं वागणं अत्यंत दुर्दैवी आहे, असे अनेकांनी म्हटलं आहे.
रावसाहेब दानवे यांचा हा व्हिडीओ ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भर सभेत दाखवला असून त्यांनी दानवे यांच्यावर गंभीर टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, अशा पद्धतीने हे जर लोकांना लाथा घालत असतील तर जनता यांना लाथाडल्याशिवाय राहणार नाही. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्याची चळवळ म्हणजे बाबासाहेबांची चळवळ आहे. अशा महाभागांना जनता २० तारखेला जागा दाखवेल असे अंधारे म्हणाल्या.