India's Got Latent News : समय रैना याच्या 'इंडियाज गॉट लॅटेंट' या शोमध्ये आई-वडील व मुलांच्या नात्याबद्दल घाणेरडे व अश्लील वक्तव्य करणारा लोकप्रिय यूट्यूबर रणवीर अल्लाबादिया पुरता गोत्यात आला आहे. त्याच्या वक्तव्यामुळं संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याच्या वक्तव्याचा निषेध करत कारवाईचे संकेत दिले आहेत. मुंबईतील वकिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस अॅक्शनमध्ये आले असून चौकशीसाठी ते स्टुडिओमध्ये पोहोचले आहेत.
अलाहबादियानं केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी स्वत: त्याचं वक्तव्य पाहिलेलं नाही. मात्र मला जे कळलंय त्यानुसार काहीतरी अभद्र टिप्पणी करण्यात आली आहे. ही गोष्ट निश्चितच चुकीची आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतो तेव्हा आपलं स्वातंत्र्य संपुष्टात येतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. समाज म्हणून आपल्याकडं काही नियम आहेत, त्यांचं कोणी उल्लंघन करत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
युट्यूबर रणवीर अल्लाबादिया, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्व मखीजा, कॉमेडियन समय रैना आणि 'इंडियाज गॉट अलेक्टेंट' या शोच्या आयोजकांविरोधात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभेच्या खासदार रेखा शर्मा यांनी हा धक्कादायक व्हिडिओ असल्याचं म्हटलं आहे. मला वाटतं की महिला असो वा पुरुष, अशा प्रकारचा विनोद समाज कधीच स्वीकारत नाही. आई किंवा स्त्रीच्या शरीराबद्दल विनोद करणं चांगलं वाटत नाही आणि कुठेतरी आजची तरुणाई नैतिकदृष्ट्या खालच्या पातळीवर कशी उतरली आहे, हे यातून दिसून येतं, असं त्या म्हणाल्या.
झामुमोच्या खासदार महुआ मांझी यांनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते या तरुणाला बक्षीस मिळालं होतं. त्यानं किमान त्याचा आदर करायला हवा होता, असं त्या म्हणाल्या. 'आई-वडील आणि मुलांचं नातं अतिशय शुद्ध असतं. त्यावर अशी अश्लील टिप्पणी करणं मान्य नाही. कडक कारवाई व्हायला हवी... संबंधित मंत्रालयानं कारवाई करावी... अशा अनेक वेब सिरीज आहेत ज्या कुटुंबासोबत एकत्र बघता येत नाहीत... याची जबाबदारी केंद्र सरकार आणि संबंधित मंत्रालयाची आहे... त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे, तरच ते धडा शिकतील, असंही त्या म्हणाल्या.
संबंधित बातम्या