मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी सभेपूर्वी हनुमान चालिसा म्हणावी : नवनीत राणा

हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी सभेपूर्वी हनुमान चालिसा म्हणावी : नवनीत राणा

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 14, 2022 10:55 AM IST

हनुमान चालिसाच्या मुद्दयावरुन पुन्हा एकदा दिल्लीतनं राणा दांपत्यानं उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. अशात आज होणाऱ्या मास्टर सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा
नवनीत राणा आणि रवी राणा (हिंदुस्तान टाइम्स)

जामिनावर बाहेर पडल्यानंतर आता खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिल्ली गाठून उद्धव ठाकरेंच्या सभेआधीच शनिवारचा मुहूर्त गाठत दिल्लीच्या प्राचीन हनुमान मंदिरात महाआरती केली आणि हनुमान चालिसा पठण केलं. आज मुंबईत उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. मात्र त्यापूर्वीच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी नवी दिल्लीतनं हनुमान चालिसा पठण करुन पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना शिंगावर घ्यायची भाषा केली आहे. दिल्लीतल्या कनॉट प्लेस इथल्या प्राचीन हनुमान मंदिरात नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालिसा पठण केलं. त्यापूर्वी नवनीत राणा यांनी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो पोस्ट केलाय. ज्यात त्यांनी भगवी शाल घातल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या हातात एक हनुमानाची मूर्तीही असल्याचं पाहायला मिळालंय. उद्धव ठाकरेंच्या सभेआधीच नवनीत राणा यांनी फरफेक्ट टायमिंग साधल्याचं सांगितलं जातंय.

हनुमान मंदिरात पूजा करण्याआधी नवनीत राणा यांनी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी २०० किमी चालण्यासही आपण तयार असल्याचं सांगितलंय. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रावर आलेलं संकट आहे, हे संकट दूर व्हावं यासाठी आपण हनुमान चालिसा म्हणणार असल्याचंही नवनीत राणा म्हणाल्या आहेत. याशिवाय नवनीत राणा आणि रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंना एक आव्हानही दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी सभा सुरु करण्यापूर्वी हनुमान चालिसा म्हणावी असं रवी राणा आणि नवनीत राणा यांचं म्हणणं आहे. त्यांनी हनुमान चालिसा म्हटली तर ते हिंदू आहेत असं आम्ही समजू अशा प्रकारचं वक्तव्यही राणा दांपत्याने केलंय.

हनुमान चालिसा म्हणण्याच्या वादातून नवनीत राणा यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली काही दिवस तुरुंगातही राहावं लागलं होतं. मात्र तुरुंगात असतानाही तिथल्या महिला आपल्यासोबत हनुमान चालिसा म्हणत होत्या असंही नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

एकंदरीतच शिवसेनेच्या सभेआधी राणा दांपत्यानं उद्धव ठाकरे यांना ओरबाडण्याचा प्रयत्न केलाय. आता संध्याकाळी होणाऱ्या सभेत उद्धव ठाकरे राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि राणा दांपत्याचा कसा समाचार घेतात ते पाहाणं उत्सुकतेचं असणार आहे. शिवसेनेनं मास्टर डोस असा या सभेचा टीझर लॉन्च केला आहे.

IPL_Entry_Point