Ramgiri Maharaj on National Anthem: आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमी चर्चेत असणारे सराला बेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रगीतावरच निशाणा साधला आहे. यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मिशन अयोध्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमात त्यांनी भारताच्या राष्ट्रगीतावर भाष्य केले. रवींद्रनाथ टागोर लिखित जन-गण-मन हे आपले राष्ट्रगीत नसून वंदे मातरम राष्ट्रगीत व्हावे,असे ते म्हणाले. त्याचबरोबर टागोर यांनी हे गीत का लिहिले,व तसेच त्यांनानोबेल पारितोषिक कसे मिळाले? यावरही भाष्य केलं आहे.
रामगिरी महाराज वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यापूर्वीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी आधी त्यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधात राज्यात ६० हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले होते.
संभाजीनगरमध्ये मिशन आयोध्या चित्रपटाच्या टेलर लाँचिंग कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर रामगिरी महाराज म्हणाले की, जेव्हा देश स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा ब्रिटिश राजा जॉर्ज पंचमला खुश करण्यासाठी १९११ साली हे गीत सादर केले गेले. खरे तर वंदे मातरम राष्ट्रगीत पाहिजे होते. राम मंदिराचा ५०० वर्षांनंतरचा लढा आपण जिंकला आहे. आता राष्ट्रगीतासाठी संघर्ष करावा लागेल, असेही रामगिरी महाराज म्हणाले.
रामगिरी महाराज म्हणाले की,रवींद्रनाथ टागोर यांनी हे गाणे ब्रिटिश राजे जॉर्ज पंचम यांच्या स्तुतीसाठी गायले होते. हे राष्ट्राला उद्देशून कधीच नव्हते.तो ब्रिटिश राजा होता आणि तो भारतीयांवर अत्याचार करत होता. राष्ट्रगीत हे भारतातील लोकांसाठी नाही.पूर्वीच्या चित्रपटातून सनातन धर्म, हिंदूंना बदनाम करण्यात आलेले आहे.हिंदूंवर अन्याय, अत्याचारच झाले आहेत. हिंदू एकत्र आल्यावर काय होते, हे दाखवायला हवे.अन्याय, अत्याचाराविरोधात एकत्र येण्याची गरज आहे.
रामगिरी महाराज म्हणाले की, रवींद्रनाथ टागोर यांचे कार्य मोठे आहे. त्यांनी शिक्षण संस्था उभारल्या. मात्र आजही तुम्ही पाहता की, शिक्षण संस्था चालविण्यासाठी सरकारशी जुळवून घ्यावे लागते. त्याकाळात ब्रिटिश राजसत्तेत शिक्षण संस्था चालवत असताना ब्रिटिशांशी समन्वय साधून रहावे लागत होते. त्यामुळे टागोर यांनी जन गण मनच्या माध्यमातून ब्रिटिशांची स्तुती केली असावी. या स्तुतीमुळेच टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळाला, असेही महंत रामगिरी महाराज यांनी म्हटले.
संबंधित बातम्या