MPCB chairman news : रामदास कदम यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी मुलाची नियुक्ती-ramdas kadam son siddhesh kadam will be new chairman of mpcb ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPCB chairman news : रामदास कदम यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी मुलाची नियुक्ती

MPCB chairman news : रामदास कदम यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी मुलाची नियुक्ती

Mar 07, 2024 04:18 PM IST

MPCB Chairman appointment News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा धाकटा मुलगा सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी रामदास कदम यांच्या मुलाची नियुक्ती
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी रामदास कदम यांच्या मुलाची नियुक्ती

MPCB chairman appointment News : भारतीय जनता पक्षावर नाराज असलेले व ही नाराजी मीडियाकडं जाहीरपणे व्यक्त करणारे माजी आमदार रामदास कदम यांचा धाकटा मुलगा सिद्धेश कदम याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याच्या पर्यावरण खात्यानं या संदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जबाबदारी सध्या निवृत्त सनदी अधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांच्याकडं होती. मात्र, ते प्रदीर्घ काळ गैरहजर असल्याचं कारण देत सरकारनं त्यांना पदावरून दूर केलं आहे. त्यांच्या जागी सिद्धेश कदम यांची वर्णी लागली आहे.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी रामदास कदम हे एक आहेत. कदम यांचे ज्येष्ठ चिरंजीव योगेश कदम हे दापोलीचे आमदार आहेत. तर, कदम यांची शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रामदास कदम हे आक्रमक स्वभावाचे नेते आहेत. मनातल्या गोष्टी ते बिनधास्त बोलून टाकतात. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून सिद्धेश कदम यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र, त्या मतदारसंघात सध्या शिंदे गटाचेच गजानन किर्तीकर हे खासदार आहेत. मात्र कदम यांनी सिद्धेश यांच्यासाठी इच्छा व्यक्त केल्यानं किर्तीकर आणि कदम यांच्यात कलगीतुरा रंगला होता. एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून त्यावर तोडगा काढला होता. मात्र, किर्तीकर यांना डावलून अन्य कोणाला उमेदवारी देणं शक्य नसल्याचं लक्षात आल्यानंच शिंदे यांनी सिद्धेश कदम यांना मंडळाचं अध्यक्षपद दिलं आहे. पर्यावरण खातं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडंच आहे.

रामदास कदम भाजपवरही नाराज

रामदास कदम हे काही दिवसांपासून भाजपवरही नाराज आहेत. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण हे आपल्या मुलाच्या मतदारसंघात हस्तक्षेप करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. आमदाराला विश्वासात न घेता रवींद्र चव्हाण हे दापोलीमध्ये कामं करत आहेत. त्याबद्दल नुकतीच कदम यांनी मीडियात जाहीर नाराजी व्यक्त केली.

'आम्ही मोदी आणि शाह यांच्यावर विश्वास ठेवून भाजपसोबत आलो आहोत. आमच्याशी विश्वासघात होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांची कानउघडणी करायला हवी. अन्यथा, भाजपविषयी चुकीचा संदेश जाईल असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.

विभाग