मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ramdas Kadam: शिवबंधन बांधून राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न, रामदास कदमांचा आरोप

Ramdas Kadam: शिवबंधन बांधून राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न, रामदास कदमांचा आरोप

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 11, 2022 05:17 PM IST

Ramdas Kadam: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय महापुरुष आहेत. कोणाच्या घरची मालमत्ता नाहीत असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

रामदास कदम
रामदास कदम (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Ramdas Kadam: शिवसेनेत बंडानंतर शिंदे गटात गेलेले नेते रामदास कदम हे सातत्यानं उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. अनेकदा थेट नाव घेत त्यांनी निशाणा साधला आहे. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट आणि ठाकरे यांच्यात वाद सुरू आहे. दरम्यान, रामदास कदम यांनी आता बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय महापुरुष असल्याचं म्हटलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतो तेव्हा त्यांच्या नातेवाईकांकडे जाऊन विचारत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेते तेव्हा त्यांच्या नातेवाईकांकडे जाऊन विचारत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय महापुरुष आहेत. कोणाच्या घरची मालमत्ता नाहीत अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

शिवबंधन बांधण्याच्या मुद्द्यावरूनही रामदास कदम यांनी गंभीर असे आरोप केले आहेत. "शिबंधन तर मलाही बांधण्यात आलं. त्यामागे शिवसेना सोडायची नाही अशी भूमिका होती. पण मला शिवबंधन बांधून आयुष्यभरासाठी राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला. शिवबंधन बांधा आणि घरीच बसा असा संदेश मला दिला," असं रामदास कदम यांनी म्हटलं.

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी मला शिंदे गटासोबत जावं लागलं. गद्दार कोण हे महाराष्ट्राची जनताच सांगेल. रामदास कदम यांनी आयुष्यात कधी विश्वासघात केला नाही आणि बेईमानीही केली नाही. माझ्या मुलाला राजकारणातून दूर करण्याचा प्रयत्न झाला. मंत्री होण्यासाठी शिंदेंसोबत गेलो नसल्यांचही रामदास कदम म्हणाले.

कामकाज सल्लागार समितीत कोणाला घ्यायचं आणि नाही हे पक्ष ठरवतो. विधीमंडळातील शिवसेनेचे ५१ आमदार एका बाजूला आहेत आणि उद्धव ठाकरेंकडे फक्त १४ ते १५ आमदार आहेत. जिथे ५१ आमदार आहे तिथे त्यांचे नाव येईल असं म्हणत रामदास कदम यांनी सदस्य निवडीवर प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडीवरही रामदास कदम यांनी टीका केली. अजित दादा राष्ट्रवादीचे तर उद्धव ठाकरे शिवसेनेचे आहेत. महाविकास आघाडीत एकत्र येऊन विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यासंदर्भात निर्णय व्हायला हवा होता ना? शिवसेना, राष्ट्रवादी आपल्याला गोवतात असं काँग्रेसला वाटत असल्यास त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं. इतकी लाचारी कशासाठी असा प्रश्नही रामदास कदम यांनी विचारला आहे.

निवडणूक चिन्हाबाबत बोलताना रामदास कदम यांनी म्हटलं की, चिन्हाचा निर्णय हा निवडणूक आयोगाचा असतो. विधीमंडळात ज्याचं बहुमत त्यालाच चिन्ह मिळतं. पुण्यात पालकमंत्री कोण महत्वाचं नाही, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांना गडचिरोलीचं पालकमंत्री करावं आणि तिथल्या जनतेला न्याया द्यावा असंही रामदास कदम यांनी म्हटलं.

 

IPL_Entry_Point