मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Tunisha Sharma : रामदास आठवले पोहोचले तुनिषा शर्मा हिच्या घरी; कुटुंबीयांशी चर्चेनंतर म्हणाले…

Tunisha Sharma : रामदास आठवले पोहोचले तुनिषा शर्मा हिच्या घरी; कुटुंबीयांशी चर्चेनंतर म्हणाले…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 29, 2022 06:03 PM IST

Ramdas Athawale visits Tunisha Sharma Home : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज तुनिषा शर्मा हिच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

Ramdas Athawale meets Tunisha Family
Ramdas Athawale meets Tunisha Family

Ramdas Athawale meets Tunisha Sharma's family : श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण खुनानंतर आता अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येचं प्रकरण चर्चेत आहे. तुनिषाच्या आत्महत्येच्या प्रकरणात वेगवेगळे दावे केले जात आहेत. हा सगळा संशयकल्लोळ सुरू असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मीरा रोड इथं जाऊन तुनिषाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. स्थानिक पोलिसांशीही त्यांनी चर्चा केली.

रामदास आठवले यांनी तुनिषाची आई, मामा व काकांशी चर्चा केली. त्यांची परिस्थिती जाणून घेतली. तुनिषाच्या आत्महत्येला शिजान खान जबाबदार असून त्यास कठोर शिक्षा करावी अशी तुनीषाच्या आईची तीव्र भावना आहे. तुनीषा हीच त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधार होती. तिच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं आहे. त्यामुळं तुनिषाची आई निराधार झाली आहे, असं आठवले म्हणाले. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांनी शर्मा कुटुंबीयांना ३ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर, महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २५ लाखांची मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

'तुनीषाची शिजानशी फक्त तीन महिन्यांची ओळख होती. तीन महिन्यात त्यानं तुनीषाला जाळ्यात ओढलं होतं. मात्र, त्याचे इतर महिलांशीही संबंध असल्याचं कळल्यामुळं ती खचली. त्यानं लग्नाला नकार दिल्यामुळं निराश होऊन तिनं टोकाचं पाऊल उचललं, असं तुनीषाच्या आईचं म्हणणं आहे. एका तरुण वयाच्या मुलीचं आयुष्य बहरण्याआधीच तिला संपविण्यास जबाबदार व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीला फाशी द्यावी. तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, असं मत आठवले यांनी व्यक्त केलं. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असंही आठवले यांनी सांगितलं.

WhatsApp channel

विभाग