मुंबई -भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी एका कार्यक्रमात तरुणांना उद्देशून म्हटले होते की, तुम्ही केवळ आवडलेली मुलगी सांगा, तिला पळवून आणून लग्न लावून देण्याची जबाबदारी माझी. या वक्तव्यावरून त्यांना माफीही मागावी लागली होती. आता त्यांनी घेतलेल्या अनोख्या शपथेमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.
आपल्या मतदारसंघातील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत डोक्यावरचे केस कापणार नाही, अशी शपथ राम कदम यांनी घेतली आहे. मतदारसंघातील डोंगराळ भागातील नागरिकांना जोपर्यंत पाणीपुरवठा होत नाही,तोपर्यंत केस कापणार नाही, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. या ट्वीटसोबत अधिकाऱ्यांशी चर्चा करतानाचा एक फोटो देखील त्यांनी शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांना देखील टॅग केलं आहे.
घाटकोपर परिसरातील डोंगराळ भागात पाणी पुरवठा होत नसल्याने स्थानिक भाजप आमदार राम कदम यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाणी प्रश्न मार्गी लागावा म्हणून महापालिका अधिकाऱ्यांसोबत सातत्याने ते बैठका घेत आहेत. त्यामुळे घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न मार्गी लागणार का? अन् भाजप आमदार राम कदम केस कटिंग कधी करणार? अशा विविध प्रश्न आता चर्चेला आले आहेत. दरम्यान राम कदमांच्या ट्वीटवर काही नागरिकांनी कमेंट देखील केल्या आहेत.