
राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार करण्यात आला असून विद्यमान राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेलयांना पुन्हा पक्षाकडून तिकीट देण्यात आले आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या १५ फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. प्रफुल्ल पटेल खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा अर्ज भरणार आहेत. भाजप, शिवसेना तसेच काँग्रेसकडून आजच आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपकडून नुकतेच काँग्रेसमधून आलेले अशोक चव्हाण, पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे यांना तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीत पराभूत झालेले माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातून सहा जागांची निवडणूक होत आहे. भाजप आपला चौथा उमेदवार देणार नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत.
भाजप, शिवसेना आणि काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला राज्यसभेचा उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा राज्यसभेवर संधी दिली आहे.
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील तीन जागांवर भाजपने उमेदवार दिले आहे. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून प्रत्येकी १-१ जागेवर उमेदवार जाहीर केले आहेत. भाजप, शिवसेना व काँग्रेसकडून आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळणार यांची उत्सुकता होती. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, बाबा सिद्धीकी यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अखेर प्रफुल्ल पटेलांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल यांच्या खासदारकीची मुदत मे महिन्यात संपणार आहे. आताच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर पटेल आधीच्या सदस्यपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर मे महिन्यात पटेलांच्या आधीच्या टर्मसाठी पोटनिवडणूक होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या पदासाठी पक्षातून अनेकजण इच्छूक होते. इतर कुणाला उमेदवारी दिली असती, तर पक्षात नाराजी पसरण्याची शक्यता होती, त्यामुळेच हा असा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे
संबंधित बातम्या
