मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राजू शेट्टी 'मातोश्री' वर.. उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; महाविकास आघाडीत सामील होणार?

राजू शेट्टी 'मातोश्री' वर.. उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; महाविकास आघाडीत सामील होणार?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 02, 2024 09:16 PM IST

Raju Shetty Meet Uddhav Thackeray : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले आहे.

Raju Shetty Meet Uddhav Thackeray
Raju Shetty Meet Uddhav Thackeray

पुढील दोन-तीन महिन्यात लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. अनेक पक्षांच्या आघाड्या होत आहेत तर काही स्वबळावर निवडणुका लढण्याचे जाहीर करत आहे. अशातच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि हातकणंगले मतदारसंघातील माजी खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राजू शेट्टी महाविकास आघाडीत सामील होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मात्र या भेटीत राजकीय चर्चा झाली नसून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळावा, यासाठी मी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

२०१९ ची लोकसभा निवडणूक राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढली होती. मात्र त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता. मागील काही दिवसांपासून राजू शेट्टी महायुती व महाआघाडी दोघांच्याही विरोधात बोलत असल्याने ते स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांनी यापुढे स्वतंत्रपणे निवणुकांना सामोरे जाणार असल्याचंही म्हटलं होते. त्यातच आज शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने ते पुन्हा महाविकास आघाडीत सामील होणार का? याची चर्चा रंगली आहे. मात्र ठाकरेंच्या भेटीनंतरही त्यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारने अदानींवरील प्रेमापोटी आयात होणाऱ्या खाद्यतेलावर पाच टक्के आयात शुल्क कमी केल्यामुळे सोयाबीनला भाव नाही. २००० साली चार हजार रुपये इतका भाव होता, २४ वर्षानंतर तो आताही तेवढाच आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अदानी उद्योग समूहाविरोधात जी लढाई सुरू आहे. त्या अदानींचा आम्हा शेतकऱ्यांनाही मोठा त्रास होत आहे. या लढाईत आम्ही उद्धव ठाकरे यांची मदत घेण्यासाठी ठाकरेंची भेट घेतल्याचं शेट्टी म्हणाले.

WhatsApp channel