मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Worli hit & run: बीएमडब्लू अपघात प्रकरणातील आरोपी मिहिर शहा यांच्या वडिलांना दणका, एकनाथ शिंदे यांनी केली कारवाई

Worli hit & run: बीएमडब्लू अपघात प्रकरणातील आरोपी मिहिर शहा यांच्या वडिलांना दणका, एकनाथ शिंदे यांनी केली कारवाई

Jul 10, 2024 02:20 PM IST

Mumbai worli BMW hit and run case : मुंबईतील वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहा याचे वडील राजेश शहा यांची शिंदे सेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

बीएमडब्लू अपघात प्रकरणातील राजेश शाह याच्यावर एकनाथ शिंदे यांची कारवाई, उपनेतेपदावरून हकालपट्टी
बीएमडब्लू अपघात प्रकरणातील राजेश शाह याच्यावर एकनाथ शिंदे यांची कारवाई, उपनेतेपदावरून हकालपट्टी (PTI)

worli hit and run case : मुंबईतील वरळी येथील बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याचे वडील राजेश शहा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

राजेश शहा हे शिंदे गटाच्या पालघर शाखेशी संबंधित आहेत. कावेरी नाखवा (४५) या महिलेच्या अपघाती मृत्यू प्रकरणात राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा हा मुख्य आरोपी आहे. या धक्कादायक घटनेच्या दोन दिवसांनंतर मुंबई पोलिसांनी मंगळवारी विरारमधून मिहीर शहा याला अटक केली.

ट्रेंडिंग न्यूज

वरळीतील डॉ. अ‍ॅनी बेझंट रोडवर रविवारी, ७ जुलै रोजी कारने स्कूटरला धडक दिली होती. त्यात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर मिहीर शहा फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी १४ पथकं तयार केली होती.

हा अपघात घडला तेव्हा बीएमडब्ल्यू कारमध्ये असलेले राजेश शहा आणि त्यांचा ड्रायव्हर राजऋषीसिंग बिडावत यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर राजेश शहा यांना मुंबईतील न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आरोपी हा नेत्याचा मुलगा असल्याने शिवसेना काहीच करणार नाही, असा आरोप हिट अँड रन प्रकरणातील पीडितेचे पती प्रदीप नाखवा यांनी केला होता.

संजय राऊत यांनी लावून धरलं होतं प्रकरण

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. आरोपींना वाचवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. हिट अँड रनची ही सामान्य घटना नाही; पुण्यात घडलेल्या घटनेसारखेच हे प्रकरण आहे, असं संजय राऊत म्हणाले होते.

राजेश शहा अंडरवर्ल्डशी संबंधित?

पोलिसांनी आरोपी राजेश शहाचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. राजेश शहा हे अंडरवर्ल्ड टोळीशीही संबंधित असल्याचा दावा करत ते मुख्यमंत्र्यांसाठी खास कसे बनले, असा सवालही त्यांनी केला.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर